Saturday, July 30, 2011

कोरीगड ट्रेक (२४ जुलै २०११)

सकाळी ७ च्या शिवनेरीने आदित्य, आतिश, रियांका, रीधीना, कार्तिक, सारिका आणि मी असे लोणावळ्याला निघालो. प्रसन्न ओलाव्याची सकाळ होती. वाशीला दिव्या आम्हाला जॉईन झाली. लोणावळ्याच्या कामत होटेलच्या इथे ड्रायवरला विनंती करून उतरलो. रस्त्याच्या पलीकडेच तीन रिक्षावाले उभे होते. आम्ही एका रिक्षात चार असे दोन रिक्षात आठ जण करून सरळ लोणावळा एसटी डेपो गाठला. एका
रिक्षाचे ६० रुपये म्हणजे ठीकच म्हणायचे.
डेपोच्या जवळ असताना मुसळधार पावसाने हजेरी लावून त्याचा नूर स्पष्ट केला. बरोबर साडे नऊला डेपोत टच झालो आणि शिल्पा-अतुलला कॉल केला. ते डेपोपासून आठ एक किलोमीटरवर होते. पेठ शहापूरला जाणारी बस बरोबर दहा वाजता सुटणार होती. इतक्यात अमेय खोपोलीहून आणि रीधीनाची पुण्याची मैत्रीण मृणालीसुद्धा पोहोचली. मस्तपैकी मुसळधार पाऊस चालू असताना एसटी कॅन्टीन मध्ये गरमागरम वडे (खरं तर चक्क थंड होते) आणि वाफाळलेला चहां (चहा मात्र होता वाफाळलेला) मारून तरतरीत झालो.
 ...दहा वाजल्यापासून एसटी मधल्या पब्लिकने स्वत:च बेल मारणं चालू केलं आणि आम्ही अस्वस्थ झालो कारण शिल्पा-अतुल जवळपास पोहोचले होते मात्र डेपोत आले नव्हते. अतुल म्हणाला आम्ही एसटीतून खाली उतरून चालत येतोय कारण ट्राफिक खूप आहे (शिल्पा-अतुल ठाणे-वंदनाहून थेट लोणावळ्याला येणाऱ्या एसटीने आले होते). शेवटी आम्ही ठरवलं कि सगळ्यांना पुढे पाठवायचं आणि मी दोघांसोबत मागाहून यायचं (कसं यायचं याचा कुठलाही प्लान नव्हता :-)]
...ड्रायवरने गाडी चालू केली आणि शिल्पा अतुल डेपोमध्ये आले. मी हात दाखवूनसुद्धा त्याने गाडी थांबवली नाही. मात्र अतुल म्हणाला कि ट्राफिकमध्ये बस अडकणार नक्की तेव्हा आम्ही तिघेसुद्धा मस्तपैकी १०० मीटरची दौड मारून बस पकडली... हुशशss!... सुदैवाने सगळे एकत्र झालो...
साधारण तासाभरात आम्ही पेठ शहापूर या पायथ्याच्या गावी येऊन पोहोचलो. (पेठच्यापुढे आंबवणे या गावातूनहि एक वाट कोरीगडावर येते मात्र ती थोडी कठीण आहे). समोर दिसणाऱ्या tower च्या बाजूने वर जाणारी वाट धरून आम्ही ट्रेक चालू केला. मग अतिशय सोप्या अश्या वाटेने वाटभर धम्माल करत, हास्य विनोद करत; मात्र अतिशय काळजीपूर्वक आणि एकमेकांकडे पूर्ण लक्ष ठेवत आम्ही चालत होतो. एकासुद्धा क्षणासाठी कुणीही नजरेच्या टप्प्याबाहेर जाणार नाही याची सर्वानीच काळजी घेतली. ट्रेकच्या बाबतीत मला आवडणारी गोष्ट म्हणजे इथे कुणावर कुरघोडी करायची नसते, एकत्र मार्गक्रमणा करायची असते आणि समूहातल्या सर्वात कमी वेगवान व्यक्तीचा वेग हाच संपूर्ण समूहाने ठेवावा लागतो...
मला वाटतं दोन एक तासात आम्ही गडमाथ्यावर पोहोचलो. वाटेत आम्हाला बुरुज आणि एक गुहासुद्धा दिसली. वाटेत एक कातळात कोरलेला आडोसा दिसला तेव्हा आदित्यने सहज आपलं “इथे पहारेकरी लपायचे” असं विधान केलं आणि त्यावर विनोद करायला पुढचे २० मिनिट कमी पडले.. पहारेकरी होते तर ते लपायचे का?, शत्रू निघून गेल्यावर मग लपलेले पहारेकरी समोरच्या स्वीम्मिंग पूल मध्ये (म्हणजे डबक्यात) पोहत सुद्धा असतील.. हाच इतिहास सांगू येणाऱ्या पिढीला म्हणजे शूरवीर होतील वगैरे वगैरे असे उच्च बुद्ध्यांकाचे आमचे विनोद चालू होते...
हो.. एक अतिशय स्वच्छ पाण्याच टाकं सुद्धा त्या कातळात होतं.. खूप स्वच्छ आणि सुरक्षित.
आम्ही माथ्यावर पोहोचताच अतिशय जोरदार वारा सुटला आणि आम्ही दोन्ही हात फैलावून त्याचा स्वीकार केला.. (आदित्यचा प्रातिनिधिक फोटो पहा).. त्यातच माझी टोपी उडून महादेवाच्या मंदिरामागच्या तळ्यात जाऊन पडली.. आणि पुन्हा एक चान्स मिळाला सगळ्यांना दात काढायला..  अमेयने स्वतःचा प्राण पणाला लावून (असं लिहिताना लिहायचं असतं; थोडं इंटरेस्टिंग वाटतं) मला कॅप आणून दिली.. [खरं तर त्या कॅप ने नक्की माझी काय मदत केली हा प्रश्न अजून मला पडलाय??? कारण माझं डोकं चिंब ओलं झालच होतं...]

अतिशय दाट धुक्यात आम्ही चालत होतो.. मधेच धुक्याची दुलई काही क्षणाकरता दूर झाली आणि दोन्ही मोठ्ठाली तळी नजरेस पडली.. लय भारी..
पुढे कोराईदेवी (गडाची अधिष्ठात्री देवी) च्या मंदिरापाशी पोहोचलो तेव्हा पाहिलं कि मंदिरात सुद्धा बरेचसे लोक आधी पासून होते आणि मंदिराच्या तीनही बाजूंना छपराच्या आडोश्याला कितीतरी ... खरंच कितीतरी लोक उभे होते... झाले का वांधे... दर्शन हि नाही आडोशाला जेवण हि नाही.. अर्रे असे वांधे होत रहातात... मग आमच्या टीम ने एक ऐतिहासिक निर्णय घेतला... आम्ही चक्क एक वर्तुळ करून भर पावसात उभे राहिलो.. आणि रीयंका ने तिने घरून आणलेला खाऊचा अक्षरश: खजिना बाहेर काढाला... ब्रेड ओम्लेट (खूप सारे ब्रेड ओम्लेट), मिनी समोसा, bread pattice (खूप सारे bread pattice), कार्तिक ने आणलेले केळीचे वेफर्स, दिव्या ने आणलेल्या खूप साऱ्या इडली आणि

चटणी यांवर अक्षरशः तुटून म्हणजे तुटून पडलो.. अहाहा... काय मजा येते.. Imagine करा... सर्कल मध्ये उभ राहून, पाऊस चालू असताना जेवायच... दोस्त लोग... ट्रेक बहोत कुछ सिखाता है... दोस्तीयारी भी और समझदारी भी... (हा माझा डायलॉग आहे.. स्वत:चा)
 ...असो, पोटपूजा झाल्यावर मला सगळ्यांना गडावरची सर्वात मोठी तोफ.. “लक्ष्मी” दाखवायची होती. देवीच्या मंदिरापाशी असताना मला ती धुक्यात पुसटशी दिसली होती. मात्र जेवण होईतो पुन्हा धुके गडद झाले आणि तोफेच्या दिशेने जाताना भलत्याच वाटेवर गेलो. डोक्यातलं नेव्हिगेशन पुन्हा ट्राय करायचं ठरवून एका दिशेने चालत गेलो आणि आम्हाला लक्ष्मीचे दर्शन झाले. आणि आम्ही भरून पावलो. (A Sincere Note: there are total six cannons on the fort, Laxmi being the biggest of all. But honestly I still have li’l suspicion whether the big cannon we spotted was Laxmi as we could not locate all the six cannons atop fort. So at least for ascertaining Laxmi please do not rely on this article).
बाकी गडावर आजूबाजूला बरेचसे अवशेष इतिहासाची साक्ष देताना दिसतच होते. १६५७ च्या सुमारास स्वराज्यात दाखल झालेला हा गड १८१८ च्या मार्च महिन्यात तीन दिवसांची निकराची झुंज देऊन शेवटी कर्नल प्राथरच्या हाती लागला. त्यासाठी त्याला दारूकोठारावर मारा करावा लागला होता. लढाईनंतर कोराई देवीचे सारे दाग दागिने लुटून नेण्यात आले होते. आज दिनी हे सर्व दागिने मुंबईच्या मुंबादेविच्या अंगावर आहेत.
बाकी इतर ऋतूत दिसणारे कर्णाळा, माणिकगड, तोरणा, प्रबळगड, माथेरान तसेच मुळशीचा अथांग जलाशय मात्र सभोवतालच्या अतिशय दाट धुक्यामुळे दिसले नाहीत. अधेमध्ये गडाच्या संरक्षक भिंतीपाशी गेल्यावर सहारा अ‍ॅम्बी व्हॅलीचे दर्शन होत होते. गडाच्या maintenance चे श्रेय मात्र सहाराला द्यावे लागेल. उचलून stand ठेवलेल्या तोफा, गडाच्या दिशेने केलेली रोषणाई, पायऱ्या यामुळे गड सहज, सोपा आणि सुंदर वाटतो. लोणावळ्यात कुटुंबासहित भुशी धरणावर किंवा पिकनिक point ला जाण्यापेक्षा हा अनुभव कधीही अधिक अविस्मरणीय असेल.
अश्या तऱ्हेने गड मनसोक्त बघितल्या नंतर आम्ही पुन्हा एकदा छान गंमतीजमती करत पायथ्याशी येऊन पोहोचलो. दुपारी साडे तीन वाजता पेठ शहापूर गावातून एसटी लोणावळ्याला जाते शक्यतो तीच गाठावी म्हणजे लोकल तरकारीच्या गाड्या वगैरेचा त्रास वाचू शकेल. त्रास त्या गाड्यांचा नसतो त्या ठरवताना कराव्या लागणाऱ्या घासाघीशीचा आणि काही लोकांच्या काही विशिष्ट प्रकारच्या वर्तणुकीचा, फसवाफसवीचा होऊ शकतो. उत्तम म्हणजे कुटुंबासोबत येणार असाल तर स्वत:चे वाहन किंवा खासगी टुरिस्ट गाडी करूनच यावे. आम्ही सर्व तरुण मंडळी असल्यामुळे आम्ही साडे तीनची गाडी जाऊ दिली आणि थोडं उशिरा पायउतार झालो. किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी आल्यावर एक वाट सहारा सिटीमध्ये जाते ती टाळावी आल्या मार्गे परत जावे म्हणजे कुणी हटकण्याचा प्रश्न येणार नाही.
शेवटी एका तरकारी स्टाईल गाडीने आम्ही लोणावळ्याला पोहोचलो... पण मजा आली... बऱ्यापैकी ओपन असल्याने भन्नाट वाऱ्याचा आनंद घेता आला. लोणावळ्यात पोहोचताच मृणालीला निगडीला जाणारी बस मिळाली. मात्र मुंबईला जाणाऱ्या गाड्याच येत नव्हत्या.

ज्या आल्या त्या भरभरून आल्या. सुदैवाने बऱ्याच उशिरा एक Tourist Tavera मिळाली आणि आम्ही रात्री उशिरा दादरकडे रवाना झालो. अमेय लोकल बसने तासाभरात खोपोलीला पोहोचला सुद्धा.
सर्वांना see you म्हणून मी दादरहून कॅब केली तेव्हा रात्रीचे साडे बारा वाजले होते. वातावरणात गारवा आणि निरव शांतता... वाटेवर असतानाच सर्वांचेच मेसेज येऊ लागले... next is what? खूप छान वाटलं.
नवा मार्ग, नवा डोंगर, नवे मित्र, नवा प्रवास, आणि मात्र घराकडे परतताना येणारी जुनीच feeling... बांद्रा ब्रीजला उजवा वळसा घेताना उगाचच कुठून कसं पण ब्रायन अडम्स चं गाणं मनावर रुंजी घालू लागलं..
c'mon c'mon c'mon - we're gonna make it home tonight
 
सप्रेम,

सौमित्र

२७.०७.२०११
c'mon c'mon c'mon - everything's gonna be alright
the nite is alive - the world is asleep
dreaming of promises they can't keep
we gotta be tough we gotta be strong
it's only love we've been waiting on...