Tuesday, June 27, 2017

गिरिदुर्ग

तेनसिंग नोर्गे यांचं एक खुप सुंदर वाक्य आहे; "लेकरु जसं आईच्या कुशीत शिरतं, पर्वतात शिरताना तसं शिरावं..."
निसर्गाने महाराष्ट्राच्या ललाटी सह्याद्रीच्या डोंगररांगा लिहिल्या. शिवछत्रपतींनी राजगड - रायगडासारखे कित्येक बुलंद गड किल्ले बांधून ती भाग्यरेषा अतूट ठेवली. आणि हे सारं वैभव आपल्या आजूबाजूला (बऱ्याच ठिकाणी ढासळलेल्या स्थितीत का असेना) अजूनही आहे हे सुदैवच, दुसरं काय? जगाच्या पाठीवर साडेतीनशे गडकोट उभे असलेला दुसरा प्रांत आहे?   

इतिहास आणि भूगोल या दोन अविभाज्य गोष्टी आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात गिरिदुर्गांचे स्थान हे ध्रुव तार्‍याप्रमाणे अढळ आहे.  

गिरिदुर्गभ्रमण म्हणजे आपल्या इतिहासाची पवित्र स्पर्शाची अनुभूती आणि निसर्गाचा सहवास यांचा सुंदर मिलाफ. दूर्गाच्या माथ्यावर पोहोचल्यावर नेमकं कसं वाटतं ते शब्दबद्ध करणं कठीण.

ब्रिटीशांनी चार महिने दुर्गराज रायगड भाजून काढला. आज तिथे पाऊल ठेवल्यावर दिसणारे भग्नावशेष आणि वास्तुंचे जोते पाहून  मन खिन्न होत जातं मात्र अजूनही सुस्थितीत असलेला शिलालेख आणि जगदीश्‍वराच्या पायरीशी "सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदूलकर" वाचून, संपूर्ण रायगड बांधून काढणार्‍या हिरोजींच्या स्वामिनिष्ठेपुढे आपण नतमस्तक होतो. आजही राजसभेत प्रवेशताना नगारखान्यापाशीच आपली पावलं आपोआप धिमी होतात. शिवछत्रपतीचं अस्तित्व या दुर्गांनी असंही जपलय. 

गिरीदुर्ग पुस्तकांसारखे असतात. सच्चे मित्र. निरपेक्ष, स्थितप्रज्ञ पण चैतन्यमय. ते खुप काही शिकवतात; कुठल्याही अभिनिवेशाशिवाय. 

निसर्गाचे सारे नियम आपल्यालासुद्धा लागू होतात. आपणही निसर्गाचाच भाग. राजगडाच्या बालेकिल्ल्याची उभी चढ़ण धैर्य "धरून" ठेवायला शिकवते, एप्रिल - मे च्या रणरणत्या उन्हात माहुली उतरताना फ़क्त एका तासात पाण्याला "जीवन" का म्हणतात याची प्रचिती येते. कधी तरी किर्र रानात रानभूल पड़ते आणि काळजाचा ठोका चुकतो मात्र इप्सित स्थळी (किंवा आल्या मार्गे परत) जाण्यासाठी विंदांची "चुकली दिशा तरीही आकाश एक आहे" आठवत  भितीवर नियंत्रण मिळवावंच  लागतं. अश्या वेळी "टीम वर्क" म्हणजे नेमकं काय ते कळतं.

गिरीदुर्ग सजीव असतात. शरीर भर प्रवाहणाऱ्या रुधिरामुळे आणि  प्राणवायूमुळे जर पार्थिव शरीर सजीव मानलं जातं तर गिरिदुर्ग सुद्धा सजीवंच!

एखाद्या दुर्गाच्या विस्तीर्ण माथ्यावर सपाटिची जागा स्वच्छ करून, कडेला लहानशी शेकोटी पेटवायची, कॅरीमॅट  पसरायची, आणि गार वाऱ्यात काळ्याशार नभांगणावरचे अमृताचे अब्जावधि थेंब डोळ्यांनी प्यायचे आणि अशी निर्मिती करणाऱ्या परमेश्वराचे अशी निर्मिती केल्याबद्दल आणि ती पहायला दृष्टी दिल्याबद्दलसुद्धा अब्जावधी आभार मानून निश्चिंत मनाने झोपी जायचे.
----
सांघिक गिरीभ्रमण हा एक उत्कृष्ट खेळ आहे. यात कुणाशीही स्पर्धा नसते, कुणावरही मात करायची नसते, आपली स्पर्धा आपल्याशीच. संघातल्या सर्वात दुर्बळ सदस्याचा वेग म्हणजे संपूर्ण संघाचा वेग असावा लागतो. सर्वांना घेऊन ठरलेल्या वेळेत डोंगरमाथा गाठून दाखवणे यात सारं काही आलं. अगदी वेळेच्या नियोजनापासून ते जोखीम व्यवस्थापनापर्यंत.

पनवेल जवळचा कर्नाळा किंवा कर्जत जवळचा पेठचा किल्ला हा गिरीभ्रमणा ची सुरूवात करायला उत्तम. मात्र एखाद्या संस्थेशी  संलग्न असणं केव्हाही चांगलं. युथ हॉस्टेल किंवा चक्रम हायकर्स सारख्या अनेक नावाजलेल्या संस्थांचे सदस्य होता येते. विशेष म्हणजे यांचे वार्षिक सदस्यत्व हे मॅकडोनाल्ड किंवा सीसीडीच्या एका बैठकीएव्हढेच असेल.
 
गिरिभ्रमण म्हणजे  निखळ आनंद. उंच  उंच  चढत  जाणाऱ्या  डोंगर वाटा  म्हणजे  जगण्यातली  आव्हानं पेलावंयाची रंगीत  तालीम देत्या होतात. तळहातावरच्या  रेषा   प्राक्तन  बदलू  शकतात  का  ते  माहित  नाही  मात्र  या  डोंगरभर उमटलेल्या या रेषा  जगण्याचा आधार  होतात  हे  नक्की.