Friday, December 4, 2015

चावंड - कुकडेश्वर ट्रेक - आणि शिवनेरीची "धावती" भेट

Chavand Fort and Kukadeshwar Temple - Geographical Locations

"...करवत कानस कुणी चालवो पिकवो कोणी शेतमळा,
कलम कागदावरी राबवो धरो कुणी हातात तुळा,
करात कंकण असो कुणाच्या वा भाळावर गंधटीळा,
शिंग मनोऱ्यावरी वाजता उभी छावणी घरोघरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ?..." कुसुमाग्रज

.............
माझ्या डाव्या पायाच्या टाचेला Plantar fasciitis चा त्रास सुरु झाला त्याला आता अर्धं वर्ष होऊन गेलं. या पावसाळ्यात राजमाचीला जाण्याचा प्रयत्न केला होता मात्र शिरोट्याहून डावा पाय अक्षरशः फरपटत माघारी वळावं लागलं होतं. तेव्हापासून मनाने नाही म्हटलं तरी कच खाल्लीच होती. काही वर्षांपूर्वी लोणावळ्याहून राजमाची श्रीवर्धन करून कोंदिवडेत सात आठ तासांत उतरलो होतो. तो फिटनेस आता संपला अश्या जाणीवेने मनाची पकड घेतली होती.
काही महिन्यांपासून सिद्धेश कदम आणि आतिश नाईक हे माझे मित्र ट्रेकला जाऊया म्हणून मागे लागले होते आणि मी त्यांना 'तुम्ही जा' किंवा 'आपण नंतर कधीतरी जाऊ' असं सांगून वेळ मारून नेत होतो. पायाने चांगलाच कॉन्फिडन्स घालवला होता. मागच्या आठवड्यात माझ्या चुलतभावाने, सारंगने रविवारी पुण्यात छत्रपतीं शिवरायांसंदर्भात एका व्याख्यानाला जाऊया म्हणून विचारले. मी त्याला त्यापेक्षा किल्ल्यावर जाऊ असं सहजच म्हटलं आणि पठठ्या एका पायावर तयार झाला.
मग मीही ठरवलं एखादा सोपासा ट्रेक करू. जिथपर्यंत जाता येईल तेव्हढं जाऊ आणि नाही जमलं तर बाकी मंडळी परत येईपर्यंत थांबून राहू अश्या विचाराने तयारी करायला घेतली. एव्हाना जेलच्या इनसोलने थोडा फरक पडला होता; म्हटलं त्याच्यावर विसंबून करू ट्रेक.
चावंड किल्ला आणि कुकडेश्वर मंदिर निश्चित झाले. किल्ल्यासंदर्भात अभ्यास करत असताना कुसुमाग्रजांची पूर्वी कधीही न वाचलेली "निर्धार" वाचनात आली आणि जणू प्रवासाची सकारात्मक नांदी झाली.
............
Fort Chavand also known as Prasanngad

चावंड (प्रसन्नगड)

जुन्नर शहराच्या वायव्येला साधारण १८ किलोमीटरवर चावंड किल्ला वसलेला आहे.

२७ नोव्हेंबर २०१५, शुक्रवार

रात्री साडे अकरा वाजता कुर्ला नेहरूनगरहून सुटणाऱ्या आणि बरोबर बाराच्या ठोक्याला वाशी डेपोत पोहोचणाऱ्या जुन्नर गाडीचं रिजर्वेशन केलं (चाकण - राजगुरूनगर मार्गे). हि रातराणी जुन्या मुंबई -पुणे हायवेमार्गे जाते. लागलीच रविवारी दुपारी साडे बारा वाजता जुन्नरहून सुटणाऱ्या गाडीचंही रिजर्वेशन करून घेतलं (माळशेज मार्गे).  
सारे जण सानपाड्यातील माझ्या घरी रात्री दहा वाजता जमले आणि तुडुंब मत्स्याहार करून रात्री सव्वा बाराला आम्ही जुन्नरकडे प्रयाण केले. हा रातराणीचा प्रवास एक आख्यायिका ठरला असता. बारा ऐवजी बारा वीसला निघून ही रातराणी लोणावळ्यातला ट्राफिक जाम टाळून नो एन्ट्रीने वर चढली आणि नंतर नेहमीच्या मार्गाला लागल्यावर समस्त ग्रांप्री विनरांना कोड्यात पाडेल अश्या अचंबित करणाऱ्या वेगाने धावू लागली आणि पहाटे साडे पाचऐवजी पाऊणे पाचला जुन्नरला 'टच' झाली.

२८ नोव्हेंबर २०१५, शनिवार

जुन्नरला आल्यानंतर सिद्धेशचा शिवनेरीला चलण्याचा विशेष आग्रह होता. मात्र गडावर नऊच्या आधी जाता येत नाही असं कळल्यावर ठरल्याप्रमाणे चावंडवर लक्ष केंद्रित करायचं ठरलं. मात्र जुन्नरहून चावंड फाट्याला जाणारी पहिली 'यश्टी' सकाळी पाऊणे आठ वाजता आहे. तिने आपण आपटाळे मार्गे चावंड फाट्यापर्यंत जाऊ शकतो. जीपगाड्यासुद्धा आठ साडेआठच्या आधी येत नाहीत.
डेपोच्या समोर रस्त्याच्या पलीकडेच मार्केट यार्ड आहे. याच्या गेटवरच चहाची गाडी आहे. वातावरणात छान गारठा असल्याने इथे आम्ही चहा पीत लोकांशी गप्पा मारत होतो. या चहावाल्या दादांनी आम्हाला जीप मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पण यश आले नाही. गप्पा आणि चहा चालूच होता.
Breakfast at Ambika Sweets and Coldrinks, Aptale
साडे सातच्या सुमारास स्टँडवर एक युवक आला. संतोष; चहावाल्या दादांचा धाकटा बंधू. त्याने चावंडच्या पायथ्याशी नेऊन सोडतो असं सांगितलं. पैशाची बोलणी झाली आणि आम्ही पाऊणे आठ वाजता चावंडकडे निघालो. न्याहारीसाठी कुठेतरी गाडी थांबव असं आम्ही संतोषला सांगितलं होतं. त्यानुसार त्याने आपटाळेत अंबिका स्वीट्स अँड कोल्डड्रिंक्स समोर गाडी उभी केली. झणझणीत मिसळ पाव आणि चहाचा आस्वाद घेवून आम्ही पुन्हा चावंडकडे निघालो. मिसळ खरंच खूप चांगली होती आणि चहासुद्धा. साधारण सव्वा आठच्या सुमारास आम्ही चावंड पायथ्याला येऊन पोहोचलो. गडावर जाण्याची वाट विचारण्यासाठी गावातल्या एका घरासमोर उभ्या असलेल्या गृहस्थासमोर संतोषने गाडी उभी केली.
चावंड फाट्यापासून हे घर साधारण सव्वा कि.मीवर आहे




त्या सद्गृहस्थाचं नाव नासीर पठाण. काय हा योगायोग! राजुरी जवळच्या पराशर अॅग्रोटूरीजमच्या (http://hachikotourism.in) मनोज हाडवळे यांनी मला सांगितलं होतं कि चावंडला जाणार असाल तर नासीरभाई पठाण यांच्याकडे जेवणाची वगैरे व्यवस्था होऊ शकेल. नासीरभाई जिथे उभे होते तेच त्यांचं घर होतं आणि घराच्या अगदी बाजूनेच वाट गडावर चालली होता.
नासीरभाई काही कामानिमित्त जुन्नरला चालले होते आणि एक वाजेपर्यंत परत येणार होते. "काय बनवू तुमच्यासाठी, डाळ-भात, भाजी चपाती?" नासिरभाईंनी विचारलं. आम्ही म्हटलं, "फक्त पिठलं भाकरी चालेल". मुक्कामाला या खोलीत झोपा किंवा शाळेच्या वर्गाची किल्ली घेतो, नासीरभाईंनी आश्वस्त केलं आणि जुन्नरला निघून गेले. आमच्या पाठपिशव्या त्या खोलीत ठेवून फक्त खाण्यापिण्याच्याच गोष्टी घेऊन आम्ही गड चढायला सुरुवात केली. आम्ही अगदी निवांत चाललो होतो.
गडाच्या सुरुवातीला अगदी रुंद पायऱ्या आहेत आणि त्या संपल्यानंतर कातळात खोदलेल्या अतिशय अरुंद पायऱ्या लागतात. खरं तर आता त्यांना पावटया म्हणू शकतो. ब्रिटिशांच्या तोफांना इथल्या पायऱ्या बळी पडलेल्या. मात्र शिवाजी ट्रेल या संस्थेने कडेने रेलिंग लावून त्या सुरक्षित केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या संस्थेने गड पुनरुज्जीवनासाठी खूप मेहनत घेतली आहे. या ठिकाणी कुणीतरी (शिवाजी ट्रेलने नव्हे) मधेच एक जंबूरका उभी पुरली आहे. काय प्रयोजन असावं काही कळलं नाही.
या अरुंद पायऱ्या संपल्यानंतर पुन्हा एकदा रुंद आणि उंच अश्या पन्नासेक पायऱ्या लागतात आणि आपण गडाच्या महादरवाज्याच्या समोर येऊन ठेपतो.
रायगड-सुधागडासारखाच हासुद्धा गोमुखी बांधणीचा दरवाजा होता. समोर जात नाही तोपर्यंत दिसत नाही. कमानीवर श्री गणेश प्रतिमेचे दर्शन होते. 
गडावर पोहोचल्यावर डाव्या बाजूने आपण पुढे गेलो कि लगेचच एक लहानसा रेखीव तलाव लागतो. त्याच्या समोरचे अवशेष मंदिर असल्यासारखे आहेत. कमान आणि शिवलिंग तर आहेच. तो रेखीव तलाव पुष्करणीसारखा वाटतो नव्हे पुष्करणीच! अमृतेश्वराच्या पुष्करणीची लहानशी प्रतिमाच जणू. गडावरले इतर वाडे-वास्तू जश्या उध्वस्त आहेत तशीच हीसुद्धा. पण तिची हि भग्नावस्थासुद्धा तिचं हे शाश्वत सौंदर्य विलुप्त करू शकलेली नाही. डावीकडे वाटेकडेला दगडी भग्न नंदी आहे. ही त्याची मूळ जागा खचितच नसावी. मन या परिसरात रेंगाळतं.






पुढे उत्तरेला सप्तमातृका नामक सात टाक्यांचा एकत्रित समूह आहे. 
चामुंडा अपभ्रंशे चावंड | जयावरी सप्तकुंड ||
गिरी ते खोदुनी अश्मखंड | प्रसन्नगडा  मार्ग निर्मिला || असा श्लोक असल्याची माहिती आंतरजालावर मिळाते. हा श्लोक कशातला आहे हे कळू शकले नाही. 

गडाच्या या उत्तर बाजूने माणिकडोह जलाशयाचा विलोभनीय नजारा दिसत होता. टळटळीत उन्हात क्वचितच असं काही मनोहारी दिसेल. तो तिकडे डावीकडे शंभू डोंगराचा तेजस्वी माथा खुणावत होता. समोरचा निमगिरी आणि उजवीकडचा हडसर हे दुर्ग मात्र नजरेस स्वच्छ दिसले नाहीत.
सप्तमातृका कुंडसमूह बघून झाल्यानंतर आम्ही गडाला डावीकडून उजवीकडे प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणेच्यावेळी आपल्या उजवीकडे किल्ल्याचा माथा/टेकडी सोबत असते. ही प्रदक्षिणा घालताना पाण्याची बरीचशी कुंडे आपल्याला दिसतात. दक्षिणेकडचा (आपटाळेच्या बाजूचा) विस्तृत मुलुख इथून दिसतो. गडावर फिरत असताना काही अवशेष, लेण्या, तगलेल्या कमानी आपल्याला सतत गडाच्या पुरातनकालीन असल्याची साक्ष देतात. 
गडफेरी पूर्ण झाल्यावर आम्ही गडमाथ्यावर जाऊन चावंडादेवीचे दर्शन घेतले. काही क्षण मंदिराच्या सावलीला उभे राहिलो आणि गडमाऊलीचा निरोप घेतला.
प्रत्येक गडमाथ्यावरून निघताना एक भावना प्रत्येक भटक्याच्या मनात उमटत असावी. "इतके सारे गड किल्ले बघायचे आहेत... आपले पुन्हा इथे येणे होईल का?..."
गडाच्या दारांत पाऊल ठेवताच सह्याद्रीचा गार वारा उंबरठ्यावरच मायेची फुंकर घालतो आणि मन पिसासारखं हलकं होऊन जातं. तेच मन गडमाथा सोडताना विलक्षण जड होतं, पाय निघत नाहीत.
....
नासीरभाई एक वाजता येणार असल्याने आणि आम्हाला जेवण करून कुकडेश्वराकडे जायचे असल्याने आम्ही गड उतरू लागलो. वाटेत आम्हाला एक दोन कुटुंबे दिसली ज्यात बरीचशी बच्चेकंपनी होती. 
 
इथे काही अतिशय महत्वाच्या गोष्टी नमूद करतो. गडावर प्रचंड रानगवत माजलं आहे; अगदी आठएक फूट उंचसुद्धा. मळलेली पायवाट सोडायची नाही. त्या वाटेवरसुद्धा संपूर्ण खबरदारी घ्यावी. नजर सावध असलेली उत्तम. आपल्या निष्काळजीपणामुळे आपल्या इच्छेविरुद्ध एखादा सरपटणारा गड रहिवासी "पाय लागू सरजी" म्हणू शकतो. या अनुषंगाने एक  महत्वाची माहिती देतो. चावंडपासून ३२ किलोमीटरवर नारायणगावात डॉ. राऊत यांचा दवाखाना सर्पदंशावर प्रभावी इलाज करण्याबद्दल विशेष प्रसिद्ध आहे. संपर्क: 02132-242346. पाठपिशव्या तर गडावर आणूच नयेत. रेलिंगच्या ठिकाणी त्रासदायक ठरू शकतात.
......
सव्वा वाजता नासीरभाईंच्या घरी पोहोचलो. त्यांच्या ओसरीवरच जेवायला बसलो. पाच जणांना पुरतील एव्हढ्या भाकऱ्या, गरमागरम पिठलं, खर्डा, कांदा आणि खडक्या तांदळाचा भात असा मेनू होता. लज्जत काय वर्णावी? नासीरभाई जवळच बसून होते आणि काय हवं नको ते बघत होते. इतकी आतिथ्यशीलता कि काय सांगावे.
......
नासीरभाईंचे आभार मानून साधारण अडीच वाजता  निघालो. कुकडेश्वराहून परत येता आले नाही किंवा यावेसे वाटले नाही तर अडचण नको म्हणून पाठपिशव्यासुद्धा घेतल्या.
कुकडेश्वर शिवालयाची वाट दाखवायला छोटा झुबैर आला...
........

 

कुकडेश्वर


चावंडच्या पश्चिमेला तीन किलोमीटरवर (पायी अंतर) कुकडेश्वराचं प्राचीन शिवालय स्थित आहे.
चावंड पायथ्यापासून एक वाट कुकडेश्वराकडे (पूर गाव) उतरते. नकाशात दिसणारी लाल रंगाची रेघ ही ती उतरणारी पाऊन किलोमीटरची वाट (अंदाजे रेखाटन). ही वाट मुख्य रस्त्याला जाऊन मिळते. आमच्या पुढे चाललेल्या एका मावशींनी आम्हाला मुख्य रस्त्यापर्यंत मार्ग दाखवला. मुख्य रस्त्यापासून मंदिरापर्यंत सव्वा दोन किलोमीटर डांबरी सडक आहे. पैकी सुरुवातीचा अर्धा एक किलोमीटर चढाचाच रस्ता आहे. इथे थोडी दमछाक होते.


साधारण चार वाजता आम्ही कुकडेश्वर मंदिरापाशी पोहोचलो. आधी एक पाण्याचं कुंड लागतं. त्या तिथेच उभं राहून जरा दुरुनच पश्चिमाभिमुखी असे ते सुंदर पुरातन मंदिर आम्ही न्याहाळत होतो. भोवतालापेक्षा वेगळेपणा या मंदिरात दिसत होता. कसलं तरी अवघडलेपणाने ते सुंदर मंदिर उभं राहिल्याचं दिसत होतं. निट पाहिल्यावर लक्षात येतं कि मंदिराच्या समोर बांधलेल्या भक्तनिवासामुळेच खरं तर त्या मंदिराच्या सौंदर्याला बाधा आली होती. ते जर इतरत्र असतं तर मंदिराबाजूने वाहणारा ओढा आणि समोर डोंगर असं दृष्य असतं. असो. कुणा शिलाहार राजाने हे मंदिर बांधलं अशी माहिती मिळाली. वर उल्लेखलेल्या अमृतेश्वराच्या मंदिरासारखंच जवळपास हेही मंदिर आहे मात्र या मंदिराचा कळस नामशेष झाला आहे. मंदिराच्या आत आणि बाहेर नानाविध शिल्पे कोरलेली आहेत. शिल्पांची आणि खांबांची कलाकुसर आणि तंतोतंतपणा -अचूकता अक्षरशः थक्क करून सोडते. मंदिरापुढे दगडी नंदी आहे. यापुढे आणखी पडझड होऊ नये या दृष्टीने मंदिराची डागडुजी चालली असल्याचं दिसतं.
या इथे एक बुआ आहेत. बुआंच्या मते हे मंदिर पांडवांनी बांधलं. आम्ही त्यावर काही चर्चा न करता त्यांना नमस्कार करून ओसरीवर एका कोपऱ्यात आमच्या कॅरीमॅटस् पसरल्या. बुआंनी विचारलं आज मुक्कामी का? आम्ही होय म्हटलं कारण आम्ही एव्हाना तसं ठरवलंच होतं. सोबत शिधा असल्यास या इथे आपण आपले जेवण बनवून घेऊ शकतो. चूल आहे. नुकतेच जेवण झाले असल्याने आम्ही झोपण्याआधी काहीच न जेवता चिवडा, संत्री वगैरे संपवायची असं ठरवलं. बुआंच्या सांगण्यावरून मंदिराच्या कुणा भल्या सेवेकऱ्याने आमच्यासाठी दोन वेळेला चहा केला. आम्ही गुरुजींचे आभार मानले आणि पायांना वोलिनी चोळून साधारण नऊच्या सुमारास झोपी गेलो.
.....

३० नोव्हेंबर २०१५, शुक्रवार संकष्ट चतुर्थी

पहाटे चांगलीच थंडी पडली. पहाटे चार वाजल्यानंतर ओसरीच्या पत्र्याच्या छतावर साचलेले दवबिंदू आमच्या अंगावर अधेमधे पडू लागले. हसून दुर्लक्ष करून चांगले साडे सहा - सात वाजेपर्यंत पडून राहिलो. उठून पाहिलं. त्या प्रसन्न सकाळी मंदिर किती वेगळं दिसत होतं. काही वेळाने सूर्यकिरणे मंदिरावर पडली. बाह्य बाजूवरील शिल्पे किती जिवंत वाटू लागली. जेव्हा बांधलं असेल तेव्हा याचं सौंदर्य किती स्वर्गीय असेल नाही?
आम्ही आन्हिकं उरकून निघायला तयार झालो. सकाळी पाऊणे आठ वाजता श्री. अशोक चिमटे यांचा टेम्पो या इथे येतो. जुन्नर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतांवर श्रमिकांना पोहोचवणे व आणणे हे त्यांचे मुख्य काम आहे. आम्ही त्यांना जुन्नरला सोडण्याची विनंती केली. एका वेळेला चाळीसेक माणसे असतात. आमच्या सुदैवाने त्या दिवशी फक्त पंचवीसेक होती. याव्यतिरिक्त नऊच्या सुमारास यश्टीसुद्धा गावात येते असं कळलं मात्र नक्की माहित नाही. आठ साडे आठनंतर मुख्य रस्त्यावर चालत आल्यास काही ना काही वाहन मात्र नक्कीच मिळेल. निघताना बुवांची पूजाअर्चा चालू असल्याने त्यांचा निरोप घेता आला नाही.
(अतिमहत्वाची नोंद: चावंड गड ते कुकडेश्वर या परिसरात मोबाईलला यत्किंचीतही रेंज नाही. वोडाफोन आणि ऐअरटेलला तरी नक्कीच नव्हती. चावंडला असताना नासिरभाई मी फोन करून येतो असं सांगून मोबाईल घेवून मोटारसायकलने कुठे तरी जावून आले. तोही आयडियाचा असावा बहुतेक. जुन्नर व आपटाळे येथे रेंज आहे)

शिवनेरीची धावती भेट

 

साधारण नऊच्या सुमारास आम्ही जुन्नरजवळ पोहोचलो. परतीच्या यश्टीला तीन तास अवकाश असल्याने सिद्धेश म्हणाला आपण शिवनेरीवर जाऊन येऊया. इतर दोघेही तयार झाले. अशोकभाऊंनी १०० रुपयांत गडपायथ्यापर्यंत जीप ठरवून दिली. मात्र आम्ही न्याहारीसाठी पायथ्याच्या अलीकडे दत्तमंदिराच्या समोरच्या हॉटेलपाशी गाडी थांबवली (परतताना जी घाई झाली त्यादृष्टीने ही मोठी चूक होती). आधीच सव्वानऊ वाजले होते. मी स्पष्ट या मताचा होतो कि शिवनेरीसाठी पुन्हा यावे कारण शिवनेरी व्यवस्थित पाहून पुन्हा बाराच्या आत जुन्नर डेपो गाठणे निव्वळ अशक्य होते. तरीही मुलांचा आग्रह होता कि परत येऊच पण आता वेळ आहे तर फक्त शिवाईदेवीचं मंदिर आणि महाराजांचा पाळणा बघून येऊया बाकी काही नको. एव्हाना मला गृहमंत्रालयातून संदेश आला होता कि आपण शिवनेरी चांगलाच बघितला आहे (http://saumitrasalunke.blogspot.in/2012/11/strategic-geographical-location-google.html) तेव्हा तुम्ही खालीच बरे असावे. किल्ला सोपा आहे मुलं जाऊन येतील. उद्या ऑफिसला जायचंय. दत्तगुरूंची क्षमा मागून मिनिस्ट्रीत खोटा निरोप पाठवला कि मी निवांत दत्तमंदिरात बसणार आहे. मन तर केव्हाच गडमंदिरावर धाव घेऊ लागलं होतं. पुन्हा मिसळ आणि चहा ढोसून आम्ही चौघे तयार झालो. ध्येय एकंच. आपल्या राजाच्या पवित्र जन्मस्थानाचे, समस्त भारतभूच्या एका स्फूर्तीकेंद्राचे दर्शन घेऊन यायचे. हॉटेलमधेच बॅग्ज टाकल्या. गडाकडे अक्षरशः पळत सुटलो तेव्हा पाऊणे दहा वाजले होते. साडे अकराला पुन्हा येणे गरजेचे होते. दत्त मंदिरापासून गडपायथा सुमारे एक किलोमीटर आहे. इथेच खरी दमछाक होते. पण आई शिवाईदेवीपाशी पोहेचेपर्यंत दोन वेळा एकेका मिनिटांसाठी बसलो असू तेव्हढेच. 
 
गडमातेसमोर माथा टेकवून आम्ही तडक शिवजन्मस्थानाकडे रवाना झालो. वाटेत अंबरखाना आलाच. त्यानंतर मात्र फक्त सुसाट धावत आलो. टाकी पाहिली नाहीत, शिवकुंज पाहिले नाही कि कडेलोटाकडे गेलो नाही. दिसत होते फक्त शिवजन्मस्थळ.
... पाळणा पाहिला. बस्स!!! काय वेडेपणा असतो... सिद्धेशला तर खासा आनंद झाला होता. 
सारंग आणि सिद्धेशने आता जबाबदारी घेतली साडे अकराच्याआधी हॉटेलला पोहोचायची. मग काय पुन्हा स्प्रिंट. दुखऱ्या टाचेमुळे धावताना मर्यादा येत होती तेव्हा तिघांच्या वेगाला मॅच करण्यासाठी मी दोन चार शॉर्टकट मारले. सारंग आणि सिद्धेश आधी पोहोचले आणि बॅग्ज घेवून मंदिरासमोर उभे होते. त्यांच्या मागोमाग पाच मिनिटांत मी आणि आतिश पोहोचलो. वाजले होते बरोबर साडे अकरा!
एका स्थानिक दुचाकी स्वाराला सिद्धेशने विनंती केली डेपोत सोडाल का म्हणून. दुचाकीस्वार मोठ्या मनाचा माणूस होता. म्हटला आनिक एकजन बसा. सिद्धेश आणि सारंग त्यांच्या बॅगा घेऊन बसले. ते पुढे झालेच तोवर मागून जीपडं आलं आणि आम्ही दोघेसुद्धा लगोलग मागे. चौघेसुद्धा पाऊणे बाराला डेपोत हज्जर!
..... यश्टी सव्वा बाराला मार्गस्थ झाली... मग पिंपळगाव जोगा धरण... माळशेज घाट... भैरवगडाची भिंत... नानाचा अंगठा... आणि उजवीकडे हरीशचंद्र.
आता गाडी घाटात होती. नुकतेच धावत उतरल्याने टाचेवर नाही म्हटलं तरी प्रेशर आलंच होतं. थकवा आला होता. माझ्या पापण्या मिटू लागल्या होत्या तोच सिद्धेशचा आवाज कानी पडला, " सौमित्र, डिसेंबरच्या चौथ्या विकमध्ये सुट्टी आहे.. हरिश्चंद्र करूया का?"...
समाप्त