Thursday, November 15, 2012

दुर्ग: किल्ले शिवनेरी


दुर्ग: किल्ले शिवनेरी
दिनांक: शनिवार, ०३ नोव्हेंबर २०१२

दुर्गस्थ: सौमित्र आणि सुनिता साळुंके

धोरणात्मक भोगोलिक स्थान (Strategic Geographical Location): Google Earth Image
------------------------------------------------------------------------------------------------------------
पहाटे ०६ वाजता माळशेज मार्गे जाणारी कुर्ला नेहरूनगर–जुन्नर गाडी पकडून निघालो. मुरबाडच्या पुढे आल्यावर जीवधन–खडा पारशी–नानाचा अंगठा याचं सुरेख दर्शन झालं. या मार्गावर आम्ही दोघेही प्रथमच येत होतो तेव्हा डावीकडे हरिश्चंद्रगड, पिंपळगाव जोगा जलाशय बघून भान हरपलं.

साधारण ११ च्या सुमारास जुन्नरला पोहोचलो. शिवनेरी एका दिवसात करण्याजोगा आहे मात्र मुक्काम करावयाचा असल्यास लॉजिंगची व्यवस्था आहे. मात्र त्याचं बुकिंग वगैरे करूनच यावं.

थोडी विश्रांती घेऊन आम्ही साडेतीन वाजता गडाकडे प्रयाण केले. जुन्नर बस स्थानकापासून बरोबर ०३ किलोमीटरवर गडाच्या चढाचा प्रारंभ बिंदू आहे. इथवर आपण चढ्या डांबरी रस्त्याने येऊ शकतो. राजमार्गाने शिवनेरीवर जाणे अतिशय सुखद आहे. वनविभागाने अत्यंत सुंदर पद्धतीने गडाची देखभाल केली आहे. जागोजागी बागा, बसण्याची व्यवस्था आहे. एक ७०-८० चे आजोबा सुद्धा डोक्यावरचं पागोटं हातात घेऊन गड चढत होते. महादरवाजा, पीर दरवाजा, परवानगीचा दरवाजा, फाटक दरवाजा, कुलूप दरवाजा, शिपाई दरवाजा आणि हत्ती दरवाजा अश्या सात दरवाजांची मालिकाच या गडावर आहे. हे सर्व दरवाजे एकमेकांच्या माऱ्यात आहेत. या ऐसपैस मार्गावरून जात असताना अधूनमधून लहान लहान शॉर्टकट सुद्धा आपण घेऊ शकतो. मजा येतो.

लोखंडी खिळे असलेल्या लाकडी शिपाई (शिवाबाई?) दरावाज्यानंतर डावीकडची किल्ल्यावर जाणारी वाट न घेता आपण उजवीकडची वाट घ्यायची आणि शिवाईदेवीच्या दर्शनाला जायचं. महाराजांचं नामकरण आई शिवाई देवीवरून झालं हे आपल्याला ठाऊकच आहे. मंदिरातल्या पूर्णाकृती मूर्तीपुढे असलेली नाकडोळे कोरलेली स्वयंभू मूर्ती हि मुळ मूर्ती. आम्ही इथे शिरसाष्टांग नमस्कार केला. आऊसाहेब आणि स्वतः बाल शिवाजी कित्येकदा इथे आले असतील नाही?! कड्यात कोरलेल्या आणि प्रशस्त सभामंडप असलेल्या या मंदिरात आपण निशब्द होतो...

ज्या ठिकाणाहून आपण हि उजवीकडची वाट घेतली तिथे परत येऊन डावीकडच्या वाटेने गड चढू लागायचा. यानंतर मेणा आणि कुलूप दारावाज्यांतून पार होत आपण किल्ल्यावर प्रवेशतो. डावीकडे अंबरखान्याची (धान्यकोठी) इमारत आहे. रेलिंगच्या बाजूने जात राहिलं की पुढे गंगा आणि जमुना अशी कड्यात कोरलेली पिण्यायोग्य पाण्याची टाकी आहेत. इथे त्या पाण्यात आम्हाला मिनरल वॉटरच्या काही बाटल्या तरंगताना दिसल्या. हे असं का होतं किंवा काही लोक असं करू शकतात या विचाराने मन खिन्न होतं. मग शेजारीच असलेल्या “शिवकुंज” या शासनाने बांधलेल्या वास्तूत राजमाता आऊसाहेब आणि बालपणीच्या शिवरायांची पंचरशी धातूंमध्ये घडवेलेलं सुरेख शिल्प आहे. जिजाऊमातांची तेजस्वी मुद्रा संस्कारांच महत्व अधोरेखित करते. इथे खूप सकारात्मक भावना मनात निर्माण होते.

शिवकुंजापुढे आहे कमानी मस्जिद. यावर फारसी (?) लेख आढळतो. याला लागूनच कमानी टाके आहे. (शिवकुंजाच्या मागच्या बाजूने साखळीची चित्तथरारक वाट खाली उतरते).

इथून थोडंसं पुढे गेलो की आपल्याला सुंदर अशी दगडी इमारत दिसते. हि काही सामान्य वास्तू नव्हे. स्वराज्य सूर्याचा जन्म पाहिलेली हि मूर्तिमंत नशीबवान वास्तू आहे. याच्या तळघरात मराठी अस्मितेच्या सर्वोच्च मानबिंदूचा जन्म झाला... इथे साक्षात शिवप्रभूंनी जन्म घेतला. आपण या ठिकाणी आजही साक्षात सूर्याने झोके घेतलेला पाळणा बघण्याचा अवर्णनीय आनंद घेऊ शकतो. १९२५ साली करवीरच्या राजर्षी श्री. शाहू छत्रपतींच्या प्रेरणेने मुंबई प्रांताचे तत्कालीन शिक्षण अधिकारी श्री. भास्करराव जाधव यांनी या वास्तूचा जीर्णोद्धार केला. निश्चल आणि निस्तब्ध होऊन जाण्याची गडावरचे हे दुसरे ठिकाण. जिन्याने आपण पहिल्या मजल्यावर जायचे. प्रशस्त दिवाणखाना आणि पूर्वाभिमुख असलेला सज्जा आणि तिथून जुन्नर गाव पाहायचे. या वास्तूला लागूनच दक्षिणेला काही वास्तुंचे भग्नावशेष व जोते दिसतात. आपण जिना उतरून समोरच्या बदामी तलावाकडे जायचं. हा प्रशस्त तलाव आता बऱ्यापैकी कोरडाच आहे. इथून पुढे उत्तरेला कडेलोट टोक आहे. इथून जुन्नर गाव तसेच आजूबाजूचा बराच मुलुख न्याहाळता येतो. समोरच लेण्याद्रीचा डोंगर दिसतो.

इथून पुन्हा मागे शिवकुंजापर्यंत येऊन आपण बालेकिल्ल्यावर चढायचं. अंदाजे पाच एक मिनिटे लागतात. समोर इदगाह आणि त्याच्या मागे कोळी चौथरा आहे. १६५० साली मोगलांनी हजारो कोळ्यांची डोकी उडवली तो हा कोळी चौथरा.

आम्ही बालेकिल्ल्याहुनच सूर्यास्त पाहिला. आणि शिवकुंजापर्यंत उतरून आलो. पहिल्या दरवाज्यापासून ते इथपर्यंतच्या गडभ्रमंतीसाठी निवांतपणे म्हटलं तर ०३ तास पुरेसे आहेत.

आमच्या बाबतीत काही थरारक होणं मात्र बाकी होतं. ट्रेकिंगचे शूज घातले नसल्याने मी पुन्हा राजमार्गाने गड उतरायचा विचार केला होता मात्र सौंच्या इच्छेखातर साखळीचा मार्ग आहे कसा ते बघायला गेलो. गडाच्या पूर्व बाजूस कातळात कोरलेल्या या पायऱ्या येईपर्यंत आमचं उतारावर बऱ्यापैकी चालणं झालं होतं. पायऱ्यांच्या जवळ गेल्यावर आता मागे फिरण्यात “पॉईंट” नाही हे जाणवलं. मघाशी म्हटल्याप्रमाणे हि गडाची पूर्व बाजू असल्याने अंधार लवकर जाणवू लागला. शेवटी धीर करून आम्ही पायऱ्या उतरू लागलो. कलावंतीण प्रमाणे याही खेपेला ओढणीचा दोरासारखा अतिशय योग्य वापर करता आला. अर्थात हे केवळ वेळ निभावून नेण्यापुरतं. दोराला कुठलाही पर्याय नाही हे निश्चित. या वाटेवरून चढताना किंवा उतरताना पाठपिशवीचं ओझं वर ओढायला किंवा खाली सोडायला दोर असल्यास उत्तमच. आमच्या साध्या चपलांना ग्रीप नसल्याने त्या सारख्या पायऱ्यांवरून निसटत होत्या. भितीदायक प्रकार. सात मिनिटांचा तो थरारक खेळ संपला आणि थराराचा दुसरा अध्याय चालू झाला. समोर जुन्नर मध्ये दिवे लखलखू लागले. अंधार पडल्याची खुणच. अजून अर्धा तासाची गर्द जंगलातून उतरणारी वाट शिल्लक होती. आता मात्र मी विजेरी बाहेर काढली आणि आम्ही वेगाने उतरू लागलो. पूर्वेला निवाऱ्याच्या जागा असल्याने आणि पाण्याचे स्त्रोत असल्याने मला वन्य श्वापदांची अवचित अवेळी गाठ-भेट टाळायची होती. त्यामुळेच वन विभागाच्या जंगलाची हद्द असणाऱ्या भिंतीपर्यंत लवकरात लवकर पोहोचणे आवश्यक होते. बिबळ्यांच्या परिसरात वावरताना वाकणे, बसणे असे प्रकार टाळावेत. शक्यतो ताठ चालावं.

शेवटी पुढच्या पंचवीस मिनिटांत साधारण ०६.४० च्या सुमारास आम्ही भिंत क्रॉस केली आणि पुढच्या दहा मिनिटांत डांबरी रस्त्याला लागलो. या अर्ध्या तासात मी तीन वेळा पाय घसरून पाठीवर पडलो होतो. रस्त्यावर पोहोचल्यावर मागे वळून गडाकडे पाहिलं तर अंधारगुडूप... पाऊणे सात वाजता. फक्त बाह्यरेषा दिसत होती. आपल्या तेजस्वी इतिहासाची पहाट पाहिलेल्या त्या शिवनेरीस त्रिवार मुजरा करून आम्ही दोघे अंधारलेल्या रस्त्यावर जड पावलांनी चालू लागलो.
--------------------------------------------------------------------------------------
* पाटबंधारे व वनखात्याची पूर्वपरवानगी असल्यास जुन्नरच्या ८ किलोमीटर वायव्येस असलेल्या अनुक्रमे माणिकडोह (शहाजी सागर जलाशय) धरण व बिबट निवारा केंद्र या ठिकाणांना भेट देता येईल.
* जुन्नर डेपो ते शिवनेरी पायथा बस सेवा आहे (एक मार्गी रु. १०). या बसेस शिवनेरी मार्गे वडज, कुसूर तसेच अन्य गावांत जाणाऱ्या आहेत. डेपोत चौकशी करावी. तसेच ऑटो केल्यास एक मार्गी रु. ५०-६० होतात.   
* शिवनेरीच्या पायथ्याला असलेलं हॉटेल शिवनेरी हलक्या न्याहारी / जेवणासाठी वगैरे उत्तम आहे. याच ठिकाणी जुन्नर डेपोत जाणाऱ्या व येणाऱ्या एस. टी थांबतात.
* जुन्नर शहरात शंकरपुरा पेठेत असलेल्या श्री. साठे यांचे “श्री” भोजनालय हे अत्यंत उत्कृष्ट आहे. इथे जेवायलाच हवं. खरं तर इथेच जेवायला हवं.
* शंकरपुरा पेठेतून डेपोला येताना जुन्या जुन्नरची दगडी तटबंदीची वेस गतकाळाची साक्ष देत विदिर्णावस्थेत उभी आहे. 

Monday, November 5, 2012

घनगड आणि तेलबैला


घनगड आणि तेलबैला

भेट दिलेले दुर्ग: घनगड आणि तेलबैला

दिनांक: २० व २१ ऑक्टोबर २०१२

दुर्गयात्री: १. आतिश नाईक, २. किशोर सावंत, ३. सौमित्र साळुंके

------------------

लोणावळ्याच्या साधारण दक्षिणेला ३५ किलोमीटरवर घनगड स्थित आहे. गडाची उंची समुद्र सपाटीपासून ७९४ मीटर असून गड पायथ्यापासून २०० मीटर उठावला आहे.

१९  तारखेच्या रात्री साडे अकराच्या मुंबई (बोरीवली डेपो) – स्वारगेट एशियाडने मध्यरात्री अडीच वाजता लोणावळा डेपोत पायउतार झालो. भाम्बर्डे (बऱ्याच ब्लॉग्जमध्ये या गावाचा उल्लेख भाम्बुर्डे असा आढळला आहे) गावी जाणारी एस.टी नऊ वाजताची असल्याने सकाळी सात वाजेपर्यंत थोडी विश्रांती घेतली. डेपोकडे तोंड करून उभे असल्यास आपल्या डाव्या हाताला सगळ्यात शेवटी पाण्याची व्यवस्था आहे. इथे दंतमंजन इत्यादी उरकावे. अलीकडच्या ‘सुलभ’ मध्ये पाणीसुद्धा सुलभ किंबहुना मुबलक आहे तेव्हा चिंता नसावी. हे विस्ताराने लिहिलं कारण घनगड, कोरीगड, तेलबैला असे गिरीदुर्ग तसेच निसर्ग भटकंतीची काही ठिकाणे गाठण्यासाठी आधी लोणावळा डेपो गाठावा लागतो. बेस विलेज असतं तसा हा बेस डेपो.

लोणावळ्याहून भाम्बर्डेला जाणारी हि महामंडळाची लाल डबा बस हे एक जागतिक आश्चर्य होऊ शकतं. साल्तर खिंडीच्या अलीकडेच डाव्या बाजूचा रस्ता पकडून मौजे तिस्करी मार्गे, मुळशी जलाशयाची एक जीभ डावीकडे ठेऊन संपूर्ण डोंगर रांगेला वळसा घालून भाम्बर्डेला पोहोचते. हा गाडीमार्ग इतका अरुंद आणि उंच सखल आहे कि या मार्गावर सार्वजनिक वाहन चालवणे निव्वळ मास्टरीचं काम आहे. आतिशची प्रतिक्रिया मार्मिक होती. म्हटला इथे एस. टी.ला सुद्धा ट्रेक करत यावं लागतं. असो, मार्गे तिस्करी, रस्त्याची मस्करी बघत आम्ही सव्वा अकराच्या सुमारास भाम्बर्डेत दाखल झालो. (लोणावळा ते भाम्बर्डे गाडी भाडे – रू. ११४ तिघांचे)

इथून एक गाडीवाट वळसा घेऊन थेट एकोले या घनगडाच्या पायथ्याच्या गावी जाते. डावीकडे नवरा-नवरी-भटोबाचे सुळके आपलं लक्ष हमखास वेधून घेतात. उजवीकडे शेतभर नाचणी आणि भात झुलत असतो. एकोले गावात शिरण्याआधीच डावीकडे एक ठळक पायवाट गडावर जाते. भाम्बर्डे ते एकोले अंतर पंधरा वीस मिनिटांचे आहे. तर या पायवाटेने आपण दहा-पंधरा मिनिटांत गारजाईच्या मंदिरापाशी येऊन पोहोचतो. मंदिरासमोर दीपमाळ आणि दगडात कोरलेले मारुतीराय आहेत. घनगडावर मुक्काम करावयाचा झाल्यास हे मंदिर उत्तम आहे.  

पुढे गेल्यावर एक लोखंडी शिडी दिसते. इथून घनगडाचा कडा डावीकडे ठेवून सरळ गेल्यास एक शिलाखंड जमिनीत तिरपा रुतून बसलेला दिसतो. गडाचा कडा व हि शिळा यामध्ये एका लहानश्या गुहेत वाघजाई देवीची दगडी मूर्ती आहे. त्याच्याच पुढे कड्याला बिलगून जाणाऱ्या अतिशय अरुंद वाटेने काळजीपूर्वक गेल्यास सुमधुर पाण्याचं टाकं लागतं. या इथून पुन्हा आपण शिडीपाशी यायचं. या लोखंडी शिडीवर काळजीपूर्वक चढल्यानंतर आपण गडाच्या माथ्याजवळ पोहोचतो. माथ्यावर जाणाऱ्या मुख्य दरवाज्यात प्रवेशताच वाऱ्याचे वेगवान झोत आपलं स्वागत करतात. निवांत गेल्यास एक तास आणि सरळ सरळ गेल्यास अर्धा तास एव्हढा वेळ माथ्यावर पोहोचण्यास आपल्याला लागतो. शक्यतो गडभेटी निवांत करावी. निरीक्षण, टिपण करत गड दर्शन करावे. शर्यत लावू नये.

गडाच्या माथ्यावर आज प्रचंड गवत मजले असून बरेचसे अवशेष या गवतरानामुळे गुडूप झाले आहेत. माथ्यावरून आजूबाजूचा अतिशय विस्तीर्ण प्रदेश दिसतो. घाटमाथा आणि कोकण दोहोंचे दर्शन होते. इथून तेलबैलाचे सुळके अत्यंत मनोहारी दिसतात. सुधागड हाकेच्या अंतरावर असल्यासारखा भासतो.

सदाशिवरावभाऊंच्या तोतयास या किल्ल्यावर कैद करण्यात आले होते. या हि किल्ल्याने निजामशाही, आदिलशाही आणि शिवशाही पाहिली आहे.

आपण आल्या वाटेने आपण पुन्हा एकोले गावात यायचे. इथल्या विहिरीतून भरपूर पाणी घेऊन आता खरोखर भरपूर चालण्याची तयारी करायची. जवळजवळ दहा किलोमीटर आणि तेही उंच सखल गाडी रस्ता. आम्ही जवळ जवळ पाऊणे दोन तास चालल्यानंतर तेलबैला गावाच्या किलोमीटर भर अंतरावर असताना आम्हाला वडूस्ते-लोणावळा गाडी मिळाली. लांब डावीकडे तेलबैलाच्या मागच्या बाजूला सायंकाळच्या किरणांचा कॅनव्हास आणि मित्रांची सोबत असताना दुरवर जाणारी हि वाट फुलांसारखी टवटवीत वाटू लागते.

संध्याकाळी बरोबर ६ वाजता तेलबैला गावात आम्ही पोहोचलो होतो तेव्हा आमच्या समोर सुर्यनारायण क्षितिजाहून दिसेनासे झाले मात्र त्यांची आसमंतात पसरलेली रक्तवर्णी प्रभा आम्हाला खिंडीपर्यंत पोहोचायला पुरेशी होती. साधारण पस्तीस मिनिटांत दोन्ही सुळक्यांच्या मधल्या खिंडीतल्या बहिरोबाच्या मंदिरात आम्ही पोहोचलो. या खिंडीपर्यंतची तेलबैलाची उंची ७३० मीटर असावी. वरचे सुळके तीनेकशे मीटर असावेत. बहिरोबाच्या शेजारीच पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे. हे मंदिर ज्या गुहेच्या आधारे बांधलं आहे, त्या गुहेचा सुळका/ भिंत म्हणजे तेलबैला गड. या भिंतीवर तसेच समोरच्या सुळक्यावरसुद्धा आरोहण करता येतं मात्र ते सुनियोजित तांत्रिक प्रस्तरारोहणाचा विषय होत. प्रस्तरारोहण श्रेणी: अवघड    

ऑक्टोबरच्या त्या रात्रीचा त्या खिंडीतला वारा मी तुम्हाला कसा ऐकवू? वाट सोपी आहे. एकदा तुमची वाट वाकडी करा.

किसान मेने नामक गावकरी आणि इतर दोन गावकरी सुद्धा इथे रात्री मुक्कामी होते. त्यांनी दिलेली नाचणीची भाकरी खाऊन त्यांच्याकडून खालच्या गावांमध्ये चमचमणाऱ्या प्रकाशदिव्यांच्या आधारे परिसराची माहिती घेतली. या वेळी वारा अक्षरशः धिंगाणा घालत होता.

दिवसभर असं उंडारल्यानंतर रात्री त्या मंदिरात मुक्काम केला. शर्ट, विंडचिटर, माकडटोपी आणि पांघरून असूनसुद्धा थंडी वाजत होती. वाऱ्याच्या उनाडक्या रात्रभर चालू होत्या.

पहाटे सहा वाजता मला जाग आली. आतिश आणि किशोर दोघेही अंथरुणातून बाहेर पडेनात तेव्हा मी बाहेर येऊन समोरच्या सुळक्याच्या पायाशी असलेल्या खोबणीत जाऊन बसलो. अंधुक उजेड, चोहोबाजुच्या डोंगरांची लाइनिंग आणि अवखळ वाऱ्याचा अथक आवेश बघत बसून होतो. थोड्या वेळाने दोघेसुद्धा बाहेर आले आणि आम्ही तिघे निसर्गाचं ते जागं होण्याचं दृश्य डोळ्यांत साठवत निशब्द उभे होतो.

उजवीकडच्या भिंतीखाली एक चूल असून प्रचंड वाऱ्यामुळे आम्ही चहा करण्याचा बेत रद्द केला आणि लोणावळ्यात न्याहारी करायची ठरवलं. पाऊणे आठ वाजता आम्ही झपझप उतरत वीस एक मिनिटांत पायथ्याशी पोहोचलो. लोणावळ्याला जाणारी वडूस्ते-लोणावळा एस. टी तेलबैला गावात सकाळी बरोबर साडे आठला पोहोचते. याच एस. टी.ने सालतर खिंड मार्गे, कोरीगडाच्या पायथ्याशेजारून, ऍम्बी व्हॆली मार्गे लोणावळ्यात पावणे दोन तासात पोहोचलो. इथून मुंबईत यायला महामंडळाच्या चिक्कार गाड्या आहेत.

टिपणे:

१.    या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे प्रवास केल्यास संपूर्ण खर्च (सोबत आणलेल्या विकतच्या खाद्यपदार्थांची किंमत वगळून) रुपये तीनशेपेक्षा जास्त येणार नाही.

२.    घनगडावर चूल पेटवण्यास योग्य जागा व पुरेसे सरपण मिळू शकते.

३.    तेलबैलावर चूल न पेटविल्यास बरे असे माझे वैयक्तिक निश्चित मत आहे

४.    सोबत दुर्बिण असल्यास या ट्रेक चा आनंद खचितच द्विगुणीत होऊ शकेल.

५.    लोणावळा परिसराचा नकाशा (http://deepabhi.tripod.com/images/lonavala.jpg) आणि कंपास असल्याशिवाय घर सोडू नका



पुन्हा भेटू...

सौमित्र साळुंके

२४.१०.२०१२

Sunday, October 14, 2012

कलावंतीण सुळका


भेटीचे ठिकाण: कलावंतीण सुळकादिनांक: १३ ऑक्टोबर २०१२भटके: दोनच. मी स्वतः सपत्नीक.पहाटे चारचा गजर झाला. आम्ही दोघेही झटकन उठलो...

शेडूंग फाट्याहून प्रबळ-कलावंतीण दर्शन
....कुर्ल्याहून ५.०७ ची पनवेल लोकल पकडली आणि ६ च्या सुमारास पनवेलला पोहचलो. ठाकूरवाडी ला जाणारी बस ६.५५ ला होती. मात्र आम्ही ६.२० ची मोपाडा (मोहोपाडा असावी) ला जाणारी बस पकडून, २० मिनिटांत शेडूंग फाट्याला उतरलो. (रू.८/-एकाचे). तिथून एका ऑटोवाल्याने आम्हाला पुढच्या दहा मिनिटांत ठाकूरवाडीला पोहोचवले. (रू. ८०/-दोघांचे).
प्रबळमाचीकडे मार्गस्थ
या इथून बरोबर ७.०५ ला आम्ही प्रबळमाची, या कलावंतीण-प्रबळगडाच्या पायथ्याच्या गावाला वाट जाते. हि वाट चांगलीच मळलेली आहे. दुतर्फा झाडोरा आणि पायाखाली हे मोठ्ठाले खेकडे... J
प्रबळ माचीवर. फोटोच्या उजवीकडे, निलेश होम सर्विस
सकाळच्या प्रसन्न वातावरणात पक्ष्यांचे मधाळ कूजन ऐकत या वळणावळणाच्या वाटेने आम्ही ८.३५ च्या सुमारास प्रबळमाचीवर येऊन पोहोचलो. माचीवर आल्यानंतर पहिलेच घर लागते निलेश भूतांबरा या अतिशय उद्यमशील युवकाचे (त्याचा कुठलासा ब्लॉगसुद्धा मी जाण्यापूर्वी वाचला होता. या ब्लॉग मध्ये उल्लेख झालेले एस टी चे वेळपत्रक मात्र आता बदलले आहे). तिथे चौकशी केल्यावर कळले की तो चेन्नईला असतो. मात्र त्याचे कुटुंबीय अतिशय आतिथ्यशील असून जेवणाची उत्तम सोय करतात आणि राहाण्याचीसुद्धा सोय आहे असे कळले. त्यांच्याशी कलावंतीण-प्रबळगडाबद्दल थोडी चर्चा करून, घोटभर चहा आणि बिस्किटे खाऊन ९.१५ च्या सुमारास कलावंतीण सुळक्याकडे प्रयाण केले. कलावंतीण हा लौकिकार्थाने दुर्ग नव्हे. त्यास सुळकाच म्हणायला हवे कारण त्याचा माथा हजार-पाचशे स्क्वेअर फुटांहून जास्त नसावा. टेहळणीसाठीच त्याचा उपयोग होत असावा. असो.
या इथून पुढे कलावंतीणीचा पायथा
पुढची वाट वाडीतल्या चार दोन घरांसमोरून जाते. पैकी शेवटच्या घरात दोन कुत्रे असून. एक कुत्रा भयंकर भुंकतो. मात्र तो चावत नाही (असे वाडीतल्या लोकांनी सांगितले). मात्र ते खरेच होते. भौंकनेवाले काटते नही चा प्रत्यय आला. या घरानंतर सुळक्याच्या पायथ्यापर्यंतची वाट मळलेली मात्र चढणीची आणि दाट झाडाझुडूपांतून जाणारी आहे. निलेश होम सर्विस पासून पस्तीस मिनिटांत आम्ही सुळक्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. इथून तो सुळका आणि प्रबळगडाच्या उत्तरेकडील भिंतीचे विराट दर्शन होते. समोर माथेरानचे पठार दिसू लागते. या इथून सुळक्याची खरी चढाई सुरु होते. आम्ही दोघेच इथे असल्याने इथे आम्ही कॅमेरा बंद केला आणि चढाईवर लक्ष केन्द्रीत केलं.चढाईचा पहिला टप्पा हा कोरीव पायऱ्यांचा आहे. पायऱ्या जरी कोरीव असल्या तरी इथे काही टप्पे लक्ष विचलित केल्यास दगा देऊ शकतात. साधारण पंचवीस एक मिनिटांत आपण शेवटच्या कातळच्या टप्प्यात येतो. खरी कसरत इथे आहे.माझ्या पत्नीचा हा पहिलाच ट्रेक. त्यात रोप नव्हते. मला अश्या टप्प्यांचा बऱ्यापैकी अनुभव असल्याने आधी मी संपूर्ण कातळ चढून शक्याशक्यतेचा अंदाज बांधला. पत्नीचे शूज काहीसे आखूड असल्याने पायाची बोटे दुमडली जात होती आणि कातळाच्या बेचक्यामध्ये पाय ठेवताना अंदाज येत नव्हता. शेवटी ऑक्टोबरच्या अश्या रणरणत्या उन्हात सुद्धा तिने शूज काढून तो रॉक पॅच करण्याचा निर्धार केला. थोड्या परिश्रमानंतर आम्ही दोघेहि तो पॅच चढून माथ्यावर पोहोचलो तेव्हा पावणे अकरा वाजले होते. त्यादिवशी कलावंतिणीच्या माथा प्रथम गाठणारे आम्ही दोघेचं होतो. माझ्या पत्नीच्या, सुनीताच्या डोळ्यांमधले भाव अवर्णनीय होते. दूर नैऋत्येहून कर्नाळ्याचा अंगठा जणू काही तिला थ्म्ब्स अप करून वेल डन म्हणत होता. वायव्येला मलंग गड आणि ईशान्येच्या चंदेरीचे सुळके शिपायांप्रमाणे मानवंदना देत होते. तश्यात तिचे लक्ष पडलेल्या झेंड्याकडे गेले. तिने आजूबाजूचा दगड गोळा करून तो भगवा ध्वज अतिशय व्यवस्थित पुनर्स्थापित केला.
मलंग गड आणि चंदेरी

माथेरानचे पठार
हाच तो शेवटचा कातळ टप्पा 
कलावंतीण माथ्याहून प्रबळगड दर्शन
तिला आजूबाजूचा परिसर समजावून सांगितल्यावर साधारण सव्वा अकराच्या सुमारास आम्ही तो अवघड पॅच उतरू लागलो. उतरताना मात्र त्याने आमची चांगल्यापैकी परीक्षा घेतली. वर आणलेली पाठ्पिशवी मी ओढणीच्या सहाय्याने खाली सोडली आणि स्वतःला थोडे मोकळे केले. या खेपेस सुनीताने दुप्पट धैर्याने आणि चिकाटीने तो पॅच पूर्ण केला. वाढलेला आत्मविश्वास नजरेतून स्पष्ट होता. आम्ही दोघांनी सह्याद्रीच्या या कड्या कपारींना मनोभावे हात जोडले.मला पदार्थ विज्ञान समजत नाही, मात्र हे कातळ मला कधीच निर्जीव वाटले नाहीत. माझ्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर रुतलेले हे काळे कभिन्न कातळ मला उर्जेचे अखंड स्त्रोत वाटतात. त्याचे काही कण माझ्यात पाझरावे म्हणून त्यांची मी गळा भेट घेतो. शिवछत्रपतींना स्पर्शून गेलेले वाऱ्याचे झोत कधी काळी याच कड्यांमध्ये घुमले असतील हि कल्पनाच देहभर रोमांच उभे करते.
भौकनेवाला  या इथेच असतात 
पायऱ्या 
हा रॉक पॅच झाल्यानंतर आम्ही उरलेल्या पायऱ्यांचा टप्पा अतिशय काळजीपूर्वक पार केला. उतरताना आम्हाला सात ट्रेकर मुलांचा शिस्तबद्ध ग्रुप भेटला. तेही इथे प्रथमच आले होते. आमच्याकडून पुढच्या टप्प्यांची व्यवस्थित माहिती करून घेऊन त्यांनी आम्हाला पाणी ऑफर केले. आमच्याकडच्या पाण्याच्या बॉटलने अक्षरशः तळ गाठला होता. घोटभर पाणी पिऊन, त्यांचे आभार मानून आम्ही उरलेला टप्पा सुद्धा तितक्याच शांतचित्ताने पूर्ण केला. एकदा सुळक्याच्या पायथ्याशी आल्यावर पुन्हा एकदा आमचं प्रवास गर्द झुडूपांतून चालू झाला. साधारण अर्ध्या तासात ते शेवटच (आता पहिलं) घर आणि ते भौकनेवाले कुत्ते दिसले. तिथून पुढे पाच मिनिटांत म्हणजे अंदाजे साडे बारा वाजता निलेशच्या घरी पोहोचलो.आधी ऑर्डर दिली नसल्याने जेवण चुलीवर जेवण बनवायला दीड तास लागला. तोवर आम्ही तिथल्या मावशींशी मस्त गप्पा मारल्या. गप्पा हा माझं आवडता प्रांत आहे आणि मी मोकळ्या मनाच्या, निष्पाप माणसांशी हसत हसवत भरपूर गप्पा मारू शकतो. दोन वाजता नुकत्याच खुडलेल्या चवळीच्या आणि वांग्याच्या भाजी वर आणि तांदळाच्या भाकरीवर आडवा हात मारला. सोबत लोणचं, भाजलेले पापड आणि कांदा... अहाहा... त्या  पाण्याच्या दोन बाटल्यांचे आणि दोघांच्या भरपेट जेवणाचे मिळून दोनशे रुपये घेतले फक्त.प्रबळगड अतिशय विस्तीर्ण असून खरं तर दोन दिवस (किमान एक पूर्ण डे लाईट) पाहाण्याचा विषय आहे. तेव्हा त्यासाठी नंतर येणार होतो म्हणून मग दिवस उतरेपर्यंत बाहेर अंगणात मस्त विश्रांती घेतली. जाताना त्या मावशींनी खूप मायेने सुनीताला ताज्या चवळीची शेंगा आणि वांगी दिली आणि खाऊ घाल सगळ्यांना असं सांगितलं. आम्ही पैसे देऊ केले तेव्हा बिलकुल नकार दिला. आठवण म्हणून घेऊन जा असं म्हटल्या. आम्हाला रायगडावरील विठ्ठल अवकीरकरांची झाप आठवली. या बसक्या लहान घरांमध्ये मोठ्या मनाची माणसं भेटतात.बरोबर पाऊणे पाच वाजता आम्ही प्रबळ माची उतरू लागलो. आणि ठाकूरवाडीच्या बस थांब्यापाशी ६.०५ ला पोहोचलो. तिथे आम्हाला बोराटे (?) नावाचे वयस्क गृहस्थ भेटले त्यांना आम्ही दोघेच हा ट्रेक करून आलो आणि तेही एव्हढ्या सकाळी याच खूप आश्चर्य वाटलं. परतीची वाट पश्चिमाभिमुख असल्याने सांजेचा पिवळसर सोनेरी रंगाचा तो तेजस्वी संपूर्ण लोहगोल आम्हाला सतत दर्शन देत होता. एस.टी चा लाल डब्बा अचूक सव्वा सहाला अवतरला (मात्र आपण पावणे सहाला पोहोचणे बरे) आणि ती थोडी पुढे गावात जाऊन वळून येईपर्यंत आम्ही कलावंतिणीच्या सुळक्याकडे कडे पाहू लागलो....दूर त्या माथ्यावर तो ध्वज आम्हाला अतिशय आवेशाने फडकताना दिसत होता. पश्चिमेकडे कलणाऱ्या सूर्य नारायणाची सोनेरी किरणे त्या केसरी ध्वजाला नवसंजीवनी देत होती...@ सौमित्र साळुंके १४.१०.२०१२

Sunday, June 24, 2012

शिखर स्वामिनी कळसुबाई


शिखर स्वामिनी कळसुबाई

पहाटे सव्वा पाच वाजता घोटी बस स्थानकातून सुटणाऱ्या एस. टी. बसने पावणे सहा वाजता बारी गावात आम्ही पोहोचलो तेव्हा कळसुबाईचा ऐसपैस डोंगर नुकताच जागा झाला होता मात्र अंगावरची धुक्याची दुलई तशीच होती. पहाटच्या अश्या गारव्यात दुलई दूर सारेल तरी कोण? या अश्यावेळी त्याच्या सर्वोच्च माथ्याचे दर्शन होणे केवळ अशक्य. बारी बस थांब्याला लागून असलेल्या लहानश्या दुकानात चहा आणि पोहे घेऊनथोडासा ‘वॉर्म अप’ करून आणि पाठपिशव्या व्यवस्थित लावूनबरोबर सात वाजता आम्ही पायवाटेला लागलो. सभोवताली हिरवळ आणि वातावरणात प्रसन्न गारवा होताच.
पुढे आम्हाला एक विहीर लागली मात्र त्यात डोकावताच पाण्याच्या दुर्भिक्षाची जाणीव आम्हाला झाली. आता पाणी कुणाकडे मागायचे असा विचार करत असतानाच पुढे एका हातउपश्यावर आम्हाला बायका-माणसांची मोठी रांग दिसली. हि रांग आम्हाला मागे जाणवलेल्या परिस्थितीची अक्षरशः अधोरेषा वाटली. मात्र ग्रामस्थांनी आम्हाला स्वतःहून आमच्या बाटल्यांमध्ये पाणी भरून दिले. इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते की इथे कळसुबाई आणि पुढे भंडारदरा–रतनवाडी परिसरात भेटलेल्या सर्वच व्यक्ती आम्हाला अतिशय अगत्यशील आणि विनम्र स्वभावाच्या जाणवल्या.
या हातउपश्यानंतर आणखी एक हातउपसा आपल्याला दिसतो. त्यानंतर आपण गावठाणाच्या वरच्या बाजूस येतो. इथेच आम्हाला शाळेला चाललेल्या काही मुलांनी एका आंब्याकडे बोट दाखवले. याच आंब्याच्या उजवीकडची वाट धरून आपण चालू लागायचं. हीच मळलेली पायवाट आपल्याला शिखराकडे नेते. काही ठिकाणी छोटे छोटे चढ उतार तर काही ठिकाणी अगदी दमछाक करणारी चढण असं करत आम्ही पहिल्या शिडीपाशी येउन पोहोचलो. ज्या ठिकाणी एरव्ही लहान मोठे प्रस्तरारोहण करावे लागले असते अशा तीन ठिकाणी लोखंडी शिड्या लावण्यात आलेल्या आहेत. मात्र या शिड्यांच्या पायऱ्या काहीश्या अरुंद असल्याने गर्दी न करता, त्या अतिशय शांतचित्ताने चढाव्यात व उतराव्यात, विशेषतः पावसाळ्यात. या शिड्यांचे टप्पे काळजीपूर्वक पार केल्यास हा अतिशय सोपा ट्रेक आहे. फक्त अधून मधून दमछाक होते इतकचं. मात्र दर अर्ध्या पाऊन तासाला चार पाच मिनिटांची विश्रांती घेतल्याने या डोंगर वाटेचा प्रवास आम्हाला अतिशय आल्हाददायक वाटू लागला होता. त्यातच चढाई सुरु असताना आपल्याला वाटेत आंब्याची, करवंदीची आणि जांभळांची गच्च लगडलेली अनेक झाडेसुद्धा लागतात. मात्र त्याचा आनंद परतीच्या वाटेवर असताना घ्यायचा.
पुढे दुसऱ्या शिडीनंतर आपल्याला एक छानशी विहीर सुद्धा लागते. या सर्व प्रवासादरम्यान एक मजेशीर गोष्ट अशी की आपल्याला सतत असं वाटत राहत की डोंगरमाथा जवळ आलाय् मात्र तिथे पोहोचल्यावर लक्षात येतं की मंजील अभी दूर है...
शेवटच्या शिडीच्या आधी एक छानस पठार आपल्याला लागतं. या इथून सभोवारच परिसर अत्यंत सुंदर दिसतो. आपल्या नजरेसमोर वारा शुभ्र धुक्याला स्वतःसोबतवाहून नेत असतो, धुक्याआडून भंडारदरा जलाशयाची निळाई आपल्याला खुणावते, पठारभर इवल्याश्या खेकड्यांची लालचुटूक धावती नक्षी दिसते आणि काळ्याकभिन्न दगडांआडून मोहक रंगांची रानफुलं डोकावतात. निसर्गाच्या या अफलातून रंगसंगतीला मनापासून दाद देत आम्ही  शेवटच्या शिडीपाशी येऊन पोहोचलो.
आमच्यात एक नवा गडी असल्याने त्याच्या थोडं पुढे एकजण आणि थोडसं मागे एकजण असं करत ती शिडी पार केली. साधारणतः आपण उंचावर शिडी चढत असताना आजूबाजूला दाट धुकं असल्यास काहीशी अनामिक भीती आपल्या जवळपास घुटमळते, विशेषतः नवख्या व्यक्तीच्या. त्यात आता उतरताना कसं उतरायच हा एक प्रश्न पडलेला असतो. मात्र आपल्या सहकाऱ्यांवर ठाम विश्वास असल्यास आणि स्वत:चे मानसिक धैर्य राखल्यास असे टप्पे बिनधोकपणे पार पाडले जातात. आपण कुठे जाणार आहोत त्या बद्दलचा थोडा पूर्वाभ्यास केल्यास या भीतीवर आधीपासूनच बऱ्यापैकी मात करता येते. तसेच कुठल्याही ट्रेक ला जाताना एक दोन अनुभवी ट्रेकर असल्यास त्यांच्या अनुभवाचा खूप उपयोग आपल्याला होत असतो.
हि तिसरी शिडी पार केली की आपण माथ्यावर येऊन पोहोचतो. इथे येईपर्यंत आपल्याला साधारणपणे तीन तास लागलेले असतात. आणि इथे पोहोचल्या बरोबर आपलं स्वागत करतो भणाणता वारा आणि कोसळत्या जलधारा... शिखर स्वामिनी कळसुबाईमातेच भगव्या रंगात रंगविलेल लहानसं मंदिर या माथ्यावर आहे. आपण देवीचा आशीर्वाद घ्यायचा आणि या लहानश्या माथ्याला चक्कर मारायची. इथे सुरक्षेच्या दृष्टीने रेलिंग्ज लावल्या आहेत त्याच्या पलीकडे जाण्याचे दु:साहस मात्र करायचे नाही. बऱ्याचदा गडमाथ्यावर पोहोचल्यावर थोडं खाण्याची इच्छा आपल्या होतेच आणि आपण खातो सुद्धा. मात्र त्या इच्छेला या माथ्यावर छप्पर मिळत नाही. पाऊस थांबलेला जरी असेल तरी इथल्या अति भन्नाट वारा आपल्याला डबा उघडू देईल तर शपथ! डबा उघडणं दूर, इथे वाहणाऱ्या वाऱ्याकडे तोंड करून तुम्ही एक दोन मिनिट उभे राहून तर बघा. निसर्गाच्या एका तत्वाच्या अपरिमित शक्तीचा एक मिनिटांचा तगडा ट्रेलर बघाल... तोही फोर डी मध्ये.
इथेच जॉन म्युईर याचं एक वाक्य आठवलं,"Climb the mountains and get their good tidings. Nature's peace will flow into you as sunshine flows into trees. The winds will blow their own freshness into you, and the storms their energy". मंदिराच्या भिंतीच्या पलीकडे आंम्ही थोडं वेळ अगदी शांत बसून होतो. वाऱ्याचा ती शक्तिशाली शीळ ऐकत, त्याचा अचंबित करणारा वेग बघत...
भर पावसाळ्यात जर इथे आलात आणि सोबत कंपास असेल तर कळसूबाईचे शेजारी अलंग-कुलंग-मदन तसेच भंडारदरा, रतनगड इत्यादींच्या भौगोलिक स्थानाचा अंदाज आपल्याला येतो मात्र त्यांचे दर्शन होणे खूप कठीण आहे. मात्र तरीही ऐन पावसाळ्यात इथे येणं आणि माथ्यावरच्या पाऊस-वाऱ्याच्या खेळात स्वतःला झोकून देणं हि एक थरारक आणि अविस्मरणीय अनुभूती असते.
परतीच्या प्रवासाला निघताना, शाळेत, कुठल्यातरी इयत्तेत, भूगोलाच्या पुस्तकात, काळ्या पांढऱ्या रेघांमधल वाक्य पुन्हा आठवतं, “कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च गिरीशिखर आहे” आणि चेहऱ्यावर एक समाधानी हसू उमलत.
हे असे शब्दातीत क्षणचं जगण्याच्या प्रवासाला अखंड उर्जा देत रहातात....


कसे जावे:
१.       मध्य रेल्वेच्या घोटी स्थानकापर्यंत ट्रेनने किंवा घोटी बस स्थानकापर्यंत एस. टी. महामंडळाच्या बस ने.
२.       पहाटे ५.१५ वाजता घोटी बस स्थानकातून बारी गावात जाणारी बस पकडावी
३.       येताना कसाऱ्यापर्यंत एस. टी ने किंवा स्थानिक प्रवासी वाहानांनी येता येऊ शकते
विशेष सूचना: पुरेसे पाणी बारी गावातच भरून घ्यावे किंवा पुण्या-मुंबईहून येताना पुरेसे पाणी सोबतच आणावे