Monday, December 29, 2014

किल्ले तिकोना २८ डिसेंबर २०१४



प्रवास: मुंबईहून तिकोना
वाहन: खासगी

दोन एक वर्षांच्या अंतराने वार्मिंग अप करण्यासाठी कुठला ट्रेक निवडावा याचा विचार करत असताना २७ ला संध्याकाळी तिकोना वर शिक्कामोर्तब झाले.
आतिश नाईक आणि सिद्धेश कदम (- वर्षाच्या अंतराने ट्रेक) २७ला रात्री साडे अकरा वाजता माझ्या कामोठे इथल्या घरी पोहोचले. दोघे दिवसभर काम करून आल्याने मध्यरात्री प्रवास करण्याऐवजी थोडी विश्रांती घेऊन पहाटे लवकर निघावं असं ठरलं. घरी मस्तपैकी बुर्जी पाव वर ताव मारून विश्रांती घेतली
पहाटे गाडी हाकायची असल्याने मी चार वाजता उठून अंघोळ इत्यादी उरकलं, कॉफी बनवली आणि दोघांना उठवलं. निघण्याची तयारी रात्रीच झाली असल्याने आम्ही बरोबर ०५३० ला लोणावळ्याच्या दिशेने प्रयाण केले.
------------------
[टळलेला अपघात]
खालापूर टोलच्या चार पाच किलोमीटर अलीकडे आम्ही राईटमोस्ट लेनने चाललो होतो. खबरदारीचा ऊपाय म्हणून डावीकडच्या वाहनांना इशारा देणं चालू होतं. असं असतानाहीसुद्धा एक ट्रक चक्क उजव्या लेनमध्ये कुठलाही सिग्नल देता अतिशय अचानक घुसला. त्याच्यापासून अर्ध्या हातापेक्षाही कमी अंतरावर मी गाडी कशीबशी नियंत्रित केली (वेग होता साधारण ८०-९०). माझ्या मागच्या गाडीच्या ड्रायवरने सुद्धा तत्परतेने गाडी कंट्रोल केली. अन्यथा एक अतिशय भयंकर अपघात निश्चित होता. पहाटेच्यावेळी उभ्या असणाऱ्या ट्रक्स आणि कंटेनरच्या प्रचंड गर्दीत त्याने हुशारीने गाडी लपवली. हा प्रसंग सांगण्याचा उद्देश एव्हढाच कि वेगावर नियंत्रण हे आपल्या हातात असलेलं एकमेव साधन आहे. Streets are filled with idiots! हाच वेग जर १०० किंवा त्यावर थोडा जरी असता तर ते अर्ध्या हाताचं गणित चुकलं असतं. पहाटेच्या वेळी होणाऱ्या अपघातांचं प्रमाण हे दिवसाच्या इतर वेळी होणाऱ्या अपघातांपेक्षा जास्त असतं. उजेडाचा अभाव आणि तात्काळ मिळणारी मदत हे या वेळेचे महत्वाचे घटक. आधीच मर्कट तशातच मद्य प्याला अश्या चालकांवर आपलं नियंत्रण असत नाही.
------------------
०६३० वाजता लोणावळा डेपोत पोहोचलो. उदरभरण केल्यानंतर हवा भरण्यासाठी चार पेट्रोल पंप पालथे घातले. शेवटी एक जण म्हणाला साडे सात पर्यंत चालू करीन. थोडी विनंती करकरून शेवटी त्याने दहा मिनिटं आधी हवा भरून दिली. बाजूला नळ होता तेव्हा सकाळच्या मस्त थंडीत गाडीवर जरा ओलं फडकं फिरवून साडेसातला कुमार रिसोर्टच्या समोरून निघालो.

तिकोना किल्ला लोणावळ्याच्या २५ किलोमीटर आग्नेय दिशेला आहे. लोणावळ्यापासून साधारण -.३० किलोमीटरनंतर आपणदुधिवरे खिंडीतयेऊन पोहोचतो. या खिंडीतूनच डाव्या हाताला एक कच्चा रस्ता लोहगडाकडे जातो (संध्याकाळी परतीच्या वेळी या रस्त्याने काही गाड्या उतरताना आम्ही पाहिल्या मात्र या रस्त्याचा चढ बऱ्यापैकी आहे, रस्त्याच्या सुरुवातीलाच खडी आहेत आणि रस्ता अतिशय अरुंद आहे म्हणून इथून गाडीने वर जाण्याबद्दल आम्ही साशंक होतो कारण एकाच वेळी गाड्या समोरासमोर आल्या तर गाडी रिवर्स टाकून उतरवण्या व्यतिरिक्त दुसरा काही मार्ग आहे असं वाटत नाही, असो).

इथून पुढचा रस्ता वळणावळणांचा आणि अकस्मात चढ उतारांचा आहे. उजवीकडे पवना धरणात आभाळाची कोवळी निळाई उतरलेली, भल्या सकाळचा नवीन ताजा वारा आणि गाडी वळेल तसं चेहऱ्यावर आणि हातावर उतरणारी सूर्याची ऊब. वळणावरती पुरेशी काळजी घेतली तर दुधिवरे खिंडी पासून तिकोना पेठ पर्यंतचा प्रवास हा एक संस्मरणीय अनुभव आहे. मुळात दुधिवरे खिंडीतून जाताना गाडीतून उतरावे असे कुणालाही वाटेल असं राकट सौंदर्य या खिंडीत आहे मात्र तसं करू नये. या भर रस्त्यात गाड्या उभ्या करण्यामुळे इतरांना त्रास होतो.

खिंडीपासून पुढे १५ -१६ किलोमीटर नंतर डाव्या हाताला तिकोना पेठ गावाची कमान दिसते. साडे आठच्या आसपास आम्ही इथे पोहोचलो. कमानीपाशी असलेल्या एक दोन उपहारगृहात खाण्याची सोय होते. इथून किलोमीटर आत जायचं. उजवीकडे किल्ल्याच्या पायथ्याला थोडी मोकळी जागा आहे जिथे गाडी पार्क करता येते. किल्ल्याच्या पायथ्यापाशी जाताना एक मध्यमवयीन गृहस्थ, (श्री. सुदाम मोहोळ) पायी चालले होते. त्यांना त्यांच्या शेतापर्यंत लिफ्ट दिली. त्यांनी उतरताना सांगितलं कि त्यांचा मुलगा किल्ल्यावर पर्यटकांची नोंद करण्याचे काम करतो, आज तो बाहेरगावी गेला आहे. त्यांनी सांगितलं कि त्यांची पत्नी किल्ल्यावर असून तिथे पिठलं भाकरी, चहा-सरबत मिळू शकेल. त्यांचे आभार मानून आम्ही गडाच्या पायथ्याला गाडी पार्क केली आणि ठीक साडे नऊ वाजता ठळक वाटेने गर्द झाडीत गुडूप झालो.   

सुरुवातीचे दहा पंधरा मिनिट किंचितश्या छातीवर येणाऱ्या चढामुळे (सोपा चढ) दमायला होतं मात्र नंतर बरं वाटायला लागतं. एव्हाना आपण एका पाटीपाशी येतो. इथे दिशादर्शक बाण आपल्याला प्राचीन गुहेपाशी जाण्याचा मार्ग दाखवतो. आधी किल्ला पाहून परतीच्या वाटेला असताना इथे जायचं ठरलं. इथून लगेचंच पुढे गुहेच्या दारावाजासारख्या दिसणारया कमी उंचीच्या दगडी दरवाजासमोर आपण उभे ठाकतो. हा दरवाजा ओलांडून थोडं पुढे गेल्यावर एका शिळेवर कोरलेल्या शिवकालीन मारुतीरायाचं दर्शन होतं. हनुमंताची हि “पुच्छ तें मुरडिलें माथा” मुद्रा पाहून आपण क्षणभर तिथेच थिजतो.

मारुतीरायासमोर नतमस्तक होऊन आपण चालू लागायचं. तीन चार मिनिटांत आपण तळजाई देवीच्या मंदिरासमोर येतो. कड्याच्या फत्तरामध्ये कोरलेल्या या मंदिरापुढे पाण्याचं मोठ्ठ टाकं आहे. उपलब्ध माहितीनुसार हे मंदिर गडबांधणीच्या वेळेतील आहे. हा परिसर अतिशय सुंदर आणि शांत आहे.

हे मंदिर आणि परिसर पाहून आपण पुढे निघायचं. दहा मिनिटांत आपण चुन्याच्या घाण्यापाशी येऊन पोहोचतो. या इथेच मोहोळ यांचा स्टॉल आहे. इथे सुदाम मोहोळ यांच्या पत्नी होत्या. त्यांनी सांगितल्यानुसार चुना, गुळ आणि इतर काही साहित्य मळून त्याचा उपयोग बुरुजांचे आणि तटबंदीचे दगडी चिरे सांधण्यासाठी केला जाई. गडाच्या या ठिकाणी शिवभक्त पर्यटकांची नोंद केली जाते. गडसंवर्धनाचे पवित्र कार्य करणाऱ्या एका संस्थेच्या नावे आपण इथे देणगी देऊ शकतो. अतिश आणि सिद्धेशने गारेगार लिंबू सरबत रिचवलं आणि मी एक गरमागरम चहा प्यायलो. मावशींचे आभार मानून पुढे निघालो.

चुन्याच्या घाण्यापासून मुख्य दरवाजापर्यंत यायला दहा ते पंधरा मिनिटे लागतात. महाद्वारापर्यंत पोहोचायला उंच उंच पायऱ्यांची रास आहे. या पायऱ्यांच्या सुरुवातीपाशी आम्ही उभे असताना एक लढाऊ विमान नेमके डोक्यावरून उडत होते. बिलकुल वेळ दवडता हातातल्या मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढला.

पायऱ्या चढून आपण बालेकिल्ल्यावर प्रवेश करतो. सर्वोच्च माथ्यावर जाणाऱ्या द्वाराची कमान, बुरुज ढासळलेल्या अवस्थेत असून प्रामाणिक डागडुजी झालेली आहे. रेलिंग्स लावण्यात आले आहेत. आता आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर येतो. इथे त्र्यंबकेश्वर महादेवाचं मंदिर आहे. याही मंदिराची डागडुजी केल्याचं लक्षात येतं. मंदिरासमोर आणि किंचित खालच्या बाजूला नंदी आहेत. मंदिराच्या पोटात पाण्याची दगडी टाकी आहेत. एव्हाना सकाळचे अकरा वाजले होते मात्र तरी हवा प्रसन्न होती. महादेवाच्या मंदिरात काही क्षण ध्यानस्थ बसलो. सकल कल्याणाची विनम्र इच्छा व्यक्त करून मंदिराच्या मागच्या बाजूला फेरफटका मारायला गेलो. यातच अतिश शिवमंदिराच्या मागील बाजूच्या भिंतीवर मस्तक टेकवायला गेला आणि कसलीतरी हालचाल झाली म्हणून सावरला. त्याच्या म्हणण्यानुसार त्याने सापाचे तोंड पाहिले होते आणि तो आत्ता दगडाच्या एका भोकात होता. सिद्धेशने काढलेला फोटो टाकत आहे. तज्ञांनी माहिती द्यावी.

मंदिराच्या मागील बाजूस पाण्याचा एक तलाव असून इथून दिसणारा नजरा अप्रतिम आहे. या इथून पवना लेकचं मनोहारी दर्शन घडतं. उत्तुंग तुंग चे भौगोलिक स्थान इतके सुंदर आहे कि काय वर्णावे? त्याचा तो बेलाग कडा या इथून पाहावा. दुपारपेक्षा हे नयनरम्य दृश्य संध्याकाळच्या वेळी उठून दिसत असेल. माथ्यावरून लोहगड, विसापूर, उत्तम दिसत असावेत मात्र या वेळी ते सुस्पष्ट दिसत नव्हते.   

महाराजांनी . १६५७ मध्ये स्वराज्यात आणलेल्या या किल्ल्याला पुरंदरच्या तहात औरंग्याला द्यावे लागले. १६८२ च्या संभाजी राजेअकबर भेटीत, शहजादा या किल्ल्यावर वास्तव्यास होता मात्र इथली हवा मानवल्याने त्याला जैतापूर मुक्कामी पाठविण्यात आले.

इथे काही क्षण निवांत घालवून, महाराजांना स्मरत, मावळचे आणि आणि मावळ्यांचे उपकार आठवून आम्ही साधारण साडे अकरा वाजता गड उतरायला लागलो. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आम्ही आमचा मोर्चा दक्षिणाभिमुखी प्राचीन लेण्यांकडे वळवला. तुंग किल्ल्यावर जाण्यापेक्षा या लेण्यांकडे जाणे थोडे कष्टाचे आहे. मात्र हा गर्द झाडीचा प्रदेश डोक्यावर सावल्या धरून राहतो. अर्धवट कोरीव काम झालेली हि लेणी दगड्मातीमध्ये बुजलेल्या अवस्थेत होती. आतमध्ये गाभारा आणि तळघर आहे. स्त्री आणि पुरुषाचे एक शिल्प एका दगडावर कोरले आहे. हि लेणी पाहून पुन्हा मुख्य डोंगर सोंडेवर येण्यासाठी सव्वा तास लागतो.

या सोंडेवरून आपण पंधरा मिनिटांत गड्पायथ्याशी दाखल होतो.


-------------

दोन एक वर्षांचा खंड पडल्यानंतर केलेला हा ट्रेक शरीर आणि मन ताजेतवाने करून गेला. त्याच बरोबर या ट्रेकने आणखी एक गोष्ट केली. फिटनेस लेवल वाढवली पाहिजे हा संदेशसुद्धा हा सोपा ट्रेक देऊन गेला. पुढचा ट्रेक नाणेघाटजीवधन अशी एकमेकांना खात्री देऊन आम्ही फर्स्ट गिअर टाकला.

---------------

सौमित्र साळुंके
२९ डिसेंबर २०१४ 

         



































No comments:

Post a Comment