Wednesday, June 8, 2016

विझलेल्या मेणबत्त्या

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. पार्काजवळ कॉफी पीत असताना कॉलेजमधली एक युवती येऊन म्हणाली, “..We have organised a silent protest march seeking justice to the victim of the delhi gang rape. We would like you to join us. तिला स्पष्ट नकार देणं मला योग्य वाटलं नाही मात्र मी गेलोही नाही. थोड्याच वेळात तो मोर्चा निघाला. हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन, पेन्सील हिल्स घालून, छानपैकी मेक अप करून काही मुली “we want justice... we want justice” असं दबक्या आवाजात म्हणत चार पावलं चालल्या... चारंच. काही तरुण आणि काही काका-काकू पण होते. हे सगळं चालू असताना त्यातले चार दोन जण  (दुर्दैवाने त्यात दोन एक स्त्रियादेखील होत्या) एकमेकांकडे पाहून चक्क गालातल्या गालात हसत होते.... माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता... केवळ अविश्वसनीय आणि भयंकर!! विषय काय, हसावं केव्हा...कुठे? थोड्याच वेळात सगळे पांगले. कॉफी पीत बसल्याबद्दल मला कुठेतरी खरं तर स्वत:बद्दल बरंच वाटलं मला.  
“we want justice...we want justice” असं रोडवर म्हणून फार तर काय होईल? या प्रकरणांमध्ये स्वतंत्र न्यायालयं स्थापन झाली, तरीदेखील सर्वोच्च न्यायालय,दयेचा अर्ज या मार्गाने अशा गुन्हेगारांचा जीवनप्रवास फासाच्या दोरीने संपेल. अतीव शारीरिक आणि मानसिक यातनांनी होरपळून निघालेल्या त्या तरुणीने कितीतरी दिवस मृत्यूशी झगडत अखेर देह ठेवलाच. आणि तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आणि प्रत्यक्ष पशूंना शरमेने मान खाली घालायला लावील अश्या अतिविकृत पद्धतीने तिला जखमी करणाऱ्या नरपशूंचा वध मात्र काही सेकंदात होईल.
हि वेळ मोर्चे काढण्याची आणि मेणबत्त्या पेटवण्याची नक्कीच नाही. सत्य स्वीकारण्याची आहे. शिकण्याची आणि शिकवण्याची आहे, सावध राहाण्याची आहे.
मिलिअन डॉलर बेबी या चित्रपटातला एक प्रसंग आठवतो. बॉक्सिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेतले क्लिंट ईस्टवूड हिलरी स्व्यांकला विचारतात, You forgot the rule. Now, what is the rule? ती म्हणते: Keep my left up? त्यावर ते म्हणतात, Is to protect yourself at all times. Now, what is the rule? मग ती उत्तरते, Protect myself at all times”.
Protect yourself at all times बस... हाच एक नियम लक्षात ठेवण्याची वेळ आली आहे.
@ सौमित्र साळुंके
२७.०५.२०१३

No comments:

Post a Comment