Wednesday, June 8, 2016

पाऊस वेंधळा

पाऊस वेंधळा पुन्हा नव्याने आवेगाने येतो
नव्या सरींनी तिच्या सयींचे जुनेच गाणे गातो...
पाऊस वेंधळा भल्या सकाळी धसमुसळासा दिसतो
अन योग्यासम संध्याकाळी ध्यान लाऊनि असतो...
पाऊस वेंधळा कधी तिच्या मग डोळ्यामधला विरह वाचतो
तिच्या अंगणी तुळशीपाशी डोह साचतो...
पाऊस वेंधळा नको वाटतो अंधारातून...अंधाराचा...
उदास निश्चल अगतिक चेहरा या दाराचा...
पाऊस वेंधळा तरी कश्याने मित्र वाटतो?
तो जाताना का डोळाभर मेघ दाटतो...
पाऊस वेंधळा.... अन माझ्याही अश्या मनस्वी ओळी
तो गेला कि रिते रिते नभ अन रीतीच माझी झोळी...
@ सौमित्र साळुंके
१३ ऑगस्ट २०११

No comments:

Post a Comment