Wednesday, June 8, 2016

फेसबुक - Facebook

आजकाल सगळे फेसबुकवर असतात.
आमच्या आण्णांना फेसबुक म्हणजे काय हे समजावताना माझ्या तोंडाला फेस आला होता.
असाच फेस इंटरनेट म्हणजे काय हेसमजावतानाहि आला होता.
कुठल्यातरी वर्तमानपत्रात वाचून त्यांनी मला इंटरफेस म्हणजे काय असं विचारलं तेव्हा माझा फेस बघण्यासारखा झाला होता.
कारण मलाच ते कायअसतं ते माहित नाही.
आमच्या शेजारच्या काकूंना असे वाटते कि सर्फपेक्षा टाईडचा फेस जास्त असतो.
एरव्हीही काकुंची मतं सर्वांना बिनविरोध फेस करावी लागतात.
कारण काकूंना फेस करण्यापेक्षा त्यांची मतं फेस करणं तुलनेने सोपंच असतं.
फेशिअल म्हणजे नक्की काय हे मला माहित नाही पण काकूंची मुलगी महिन्यातून पंधरावेळा तरी ते करते.
ती रोजच चेहऱ्याला काहीतरी फेसून असते.
ती ज्या ब्युटी पार्लर मध्येजाते त्याच नाव मला आवडत नाही. “ फे  वे  ”.
नाक्यावरच्या कुठल्यातरी टवाळ मुलाने ‘फे’ वरचा मात्रा काढून टाकला होता.
कितीतरी दिवस दुकानावरचं “   वे  ” वाचून गिऱ्हाईक परत जात होतं.
अं... सॉरी, मी फेसबुकबद्दल सांगत होतो. हे असंच होतं...
फेसबुकमुळे चटकन चित्त विचलित होऊ लागलं आहे.
त्यामुळे आजकाल कशातच लक्ष लागत नाही.
स्टार प्रवाहवरलक्ष्य लक्ष्य नावाची मालिका लागते.
खरतर एकदाच लक्ष्य आहे पण ते दोनदा लक्ष्य लक्ष्य असं म्हणतात म्हणून मीही तसं म्हणतो.
मी लक्ष्य, लक्ष देऊन बघतो.
लक्ष्य गुन्हेगारीमालिका आहे.
म्हणजे खरं तर पोलिसांची मालिका आहे.
ते गुन्हेगार पकडतात.
आणि ते त्यांना सापडतात.
मलासुद्धा लहानपणी पोलीस व्हायचं होतं.
म्हणजे मला मोठेपणीच पोलीस व्हायचं होतं पण मला लहानपणीच तसं वाटायचं.
लक्ष्य लक्ष्य मधले सगळे पोलीस मोठेपणीच पोलीस झालेले आहेत.
आमच्या खालच्या मजल्यावर एक काका राहतात ते मोठे पोलीस आहेत.
ते ऑन ड्युटी चोवीस तास असतात.
ते कधी कधी जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांचा मुलगा त्यांना लवकर ओळखतच नाही.
म्हणून मला आता पोलीस व्ह्यायची भीती वाटते.
म्हणजे मला गुन्हेगार ओळखतील याची भीती वाटते असं नाही तर मला माझी आई ओळखणार नाही याची भीती वाटते.
सरळ सरळ बोलायची भीती वाटते म्हणून दुसऱ्या मजल्यावरचा सचिन पहिल्या मजल्यावरच्या वीणाच्या फेसबुकवर लिहितो.
आमच्या वरच्या मजल्यावर एक काका राहतात.
तेखूप लिहितात.
ते तत्वचिंतक आहेत असं ते स्वतः म्हणतात.
त्यांच्या वरचा मजला रिकामा आहे.
म्हणजे तिथे आता कुणी राहात नाही.
तत्वचिंतक म्हणजे काय असं मी त्यांनाएकदा विचारलं तेव्हा ते मला असं म्हणाले “घरी जा”.
मला वाटतं कि त्यांनाच त्याचा अर्थ माहित नसावा.
मी घरी जात असताना समोरच्या चाळीतला नरू मला म्हणाला," तू हॉट साप वर असतोस का?".
मी हॉट सीट ऐकलं होतं, हॉट साप पहिल्यांदाच ऐकतोय. आणि हॉट सापाच्या कल्पनेने जरा घाबरल्या घाबरल्या सारखं झालं.
पण हे हॉट साप म्हणजे काय त्याचा शोध घेऊन पुन्हा भेटीन तुम्हाला.

No comments:

Post a Comment