Wednesday, June 8, 2016

निर्मळ दिवाळी

दिपावली हा सण अंधारातून तेजाकडे नेणारा सण आहे. छान तेवणारी मंद वात, फराळाचा दरवळ घरात असं त्याचं स्वरुप आहे.
मात्र आपल्यातलेच काही लोक फटाके वाजवून आनंद साजरा करतात.. मला सांगा फटाके कश्यासाठी वाजवायचे? त्याने काय मिळतं.
मी सांगतो... त्याने वातावरणातल्या प्राणवायुला, म्हणजे ऑक्सिजनला कार्बनडाय ऑक्साइड मिळतो.
म्हणजे आपण स्वतः ला आणि आपल्या घरातल्या लहानग्यांना विषारी वायुतच उभे करतो.
याच काळात अनेक निरोगी लोकांना दम्यासारखे आजार जडतात. ते आपल्या मूळेच!
फटक्यांच्या आवाजाने अनेकांना हर्ष होतो...
मात्र आपण एक गोष्ट लक्षात घेत नाही की आजुबाजुच्या कुठल्या घरात नुकतच जन्मलेलं तान्हुलं असेल, आजारी व्यक्ती असेल, कुणाला हृदयरोग असेल.
या सर्व केसेसमधे मोठा आवाज हा भयंकर ठरू शकतो.
मूळात मोठा आवाज करून आनंदीत होणे हे मानसिक असंतुलनाचे लक्षण आहे आणि तसे आपल्यापैकी कुणाला वाटत असल्यास त्वरित मानसोपचार तज्ञाची भेट घ्यावी.
किमान उद्याच्या पिढीला तरी या विकारापासून दूर ठेवणे पालकांचे आणि नातलगांचे कर्त्तव्य आहे.
आता तुम्हाला वाटेल मग करायचे तरी काय?मी त्याचाही प्रयत्न करतो...
सुंदर रांगोळया काढ़ा,तुळशीपाशी मंद वात तेवू दया.नातेवाईकांना भेटा, बोलवा, शुभेच्छा दया.
सुट्टी घेतली आहे... उत्तम... तुमच्या आजुबाजुला अनेक ठिकाण आहेत जिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता..मुम्बैचं घ्या...
लहान मुलांना घेवून तुम्ही राणी बाग़, नेहरू तारांगण, विज्ञान केंद्र (ई मोझेस रोड वरचं), हॉर्नबिल हाउस, त्या समोरच उत्तम वस्तु संग्रहालय, अंधेरीत असलेला मोनोलिथ,
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, कर्नाळा पक्षी अभयारण्य, ओपन बस, अशी कित्येक ठिकाण दाखवू शकतो..
मुलं काय तक्रार करतील फटाके नाही दिल्याची?! फ़क्त तुमची इच्छा हवी...
चला साजरी करुया निर्मळ आनंददायी दिपावली!

@ सौमित्र साळुंखे
शुक्रवार, 17 ऑक्टोबर 2014

No comments:

Post a Comment