Wednesday, June 8, 2016

"देवबाप्पा"

फारंच नास्तिक होतोय बुवा, मन थोडं खाऊ लागलं
भक्ति पोटी देवा चरणी पुन्हा मन धावू लागलं

घाई घाईत भल्या सकाळी दुचाकीला मारली टांग
देवादारी पोचलो मात्र .. माणसांची ही एव्हढी रांग!

ठीकाय म्हटलं उभे राहू, सहज होईल ती भेट कसली,
तेव्हढ्यात त्या रांगेलगत दूसरी छोटी रांग दिसली..

ताटकळत दर्शन घेण्यासाठी कॉमन माणसांचा एक क्यू
किंवा खिसा ढिला करा, चटकन व्हा 'प्रिविलेज्ड फ्यू'...

त्यात सुद्धा वजन असेल तर तुमची ओळख कामी येईल
झटकन येऊन पटकन जाल, डोळे भरून दर्शन होईल

ऐकून होतो देवापुढे राव रंक सगळे सेम
केव्हापासून देवबाप्पा स्टेटस बघून देतोय प्रेम?

काय करायचं उभं राहायचं की आत एंट्री थेट हवी?
दर्शन घ्यायचं देवाचं की घट्ट गळा भेट हवी?

आलं लक्षात सब झूठ, हे मार्केटिंग चं पेव आहे..
जागी थिजेल तो देव कसला, माणसा माणसात देव आहे..

हसणारा देव, रुसणारा देव, धावणारा देव, बसणारा देव
खेळता पड़ता, चालता बोलता, 'क्लीशेड एक्सप्रेशन' नसणारा देव

'देवा सारखी माणसं' देवाचं देवत्व टिकवतात
देव तेच जे माणसाला माणूस रहाणं शिकवतात

लहानपणी एक बरं असतं पापण्या अगदी सहज मिटतात
गोष्टीमधले देवबाप्पा स्वप्नात येऊन स्वत: भेटतात

सौमित्र साळुंके ("देवबाप्पा" २०१२)

No comments:

Post a Comment