Wednesday, June 8, 2016

"निरोप"

आज शिवजयंती.
महिन्याच्या सुरुवातीलाच  ठरवलं होतं कि या हि वेळी रायगडावर जायचंच. पुण्यात असलो तर रजा टाकून जायचं, पण जायचं नक्की.
सारस्वतात असताना शिवजयंती चुकवली नाही. मुंबईहून जमेल तेव्हा महाड गाठायचं, मध्यरात्री तर मध्यरात्री, पहाटे तर पहाटे गडावर जाऊन थोरल्या महाराजांसमोर नतमस्तक व्हायचं, गडाच्या रौद्रतेची अनुभूती घ्यायची... इंग्रजांना मनसोक्त शिव्या द्यायच्या... या भूमीला आणि एकंदर आपल्या आयुष्यालाच अस्मितेचा स्पर्श देणाऱ्या संपूर्ण रायगडालाच त्रिवार मुजरा करून पायउतार व्हायचं हा ठरलेला कार्यक्रम...
पण गम्मत पहा..
सात तारखेला माणगावात आलो.  दुर्गाधीराज रायगड इथून सरळ रेषेत मोजाल तर १८ किलोमीटर. एस टी ने एक दीड तासाचा प्रवास... म्हटलं ठीक आहे इथलं काम उरकून आठवड्यात पुण्याला परत जाऊच.
पण असं होत नसतं..
गेले पंधरा दिवस माणगावात मुक्काम ठोकून होतो. दिवस रात्र काम करत होतो... म्हटलं पूर्ण महिनाच इथे जाणार असेल तर एक दिवसाची रजा मागून जाऊन यायचं...
काल २१ तारखेला महत्वाचा निर्णय झाला... २२ ला पुण्याला यायचा.. २२ ला.. २२ लाच! ...
सर्व documents  घेऊन पुणे ऑफिस गाठायचं होतं. must  होतं ... रात्री १२.३० ला आज सकाळच्या ताम्हिणी मार्गे जाणाऱ्या एशियाड चं online बुकिंग केलं.
मात्र त्याचं printouts ? .....?
तीच खरी गम्मत असते... वाईट...
आज सकाळी ९ वाजता मी माणगावच्या एका ऑफसेट दुकानातून प्रिंट आउट घ्यायला गेलो... आणि... दूर डाव्या हाताला दिसला... रविकिरणांच्या अभिषेकात न्हाऊन निघालेला माझा ..... रायगड!...
..... मनाची काही आंदोलनं शब्दात व्यक्त नाहीच करता येत... मी सुद्धा निशब्द होऊन तो परतीचा कागद घेऊन पुण्याला निघालो... ताम्हिणीच्या पायथ्याशी पोहोचेपर्यंत उजवीकडे दुर्गराजाचे दर्शन होत राहिले.. अक्षरश गलबलून आलं... वाटलं उतरून तडक सुटावं.. पण अगदी समोरच्या कर्तव्यापुढे आत्मसुखाला निरोप द्यावाच लागतो.. हीच तर आमच्या महाराजांची शिकवण होती...
मी सुद्धा निरोप घेतला.. त्याला म्हटलं .... "पुन्हा कधीतरी भेटू"......

@ सौमित्र साळुंके... २२.०३.२०११

No comments:

Post a Comment