Wednesday, June 8, 2016

सैराट झालं जी...

अनेक वर्षांनंतर एक अस्सल चित्रपट बघितला. अस्सल हा शब्द अनेक अंगांनी वापरतोय. अस्सल संगीत, अस्सल दिग्दर्शन, अस्सल अभिनय आणी छायांकन.
मला जातीव्यवस्थेवर केलेलं भाष्य (ज्याच्या योग्यायोग्यतेविषयी वेगळी चर्चा होऊ शकते), धुंद झालेली पिढी वगैरे गोष्टींवर बोलायचं नाही. चित्रपटाचा शेवट मला वैयक्तिक लेवल ला रुचला नाही मात्र तो अंगावर येतो हे खरं. अर्थात या गोष्टी हे लेखक दिग्दर्शकाचं स्वातंत्र्य आहे. मी याला एक "चित्रपट" म्हणून बघतो. अस्सल ग्रामीण बोली बोटावर मोजाव्या इतक्या चित्रपटात दिसते. आणि चित्रपटाचा बाज इतका ग्रामीण असूनही तो व्यावसायिकरित्या इतका यशस्वी होतोय हि कौतुकाची बाब आहे. याचं कारण हे आहे कि बघणारा प्रत्येक जण यामधल्या पात्रांशी रिलेट करू शकतो. कुणी परश्या, कुणी आर्ची, कुणी सल्या कुणी बाळ्या आयुष्याच्या नाजूक टप्प्यावर झालेले असतात किंवा असे कुणीतरी त्यांना भेटलेले असतात. अभिनयाचे कुठलेही धडे न घेतलेल्या या पोरांकडून इतका अस्सल अभिनय करवून घेतल्याबद्दल नागराज यांना सलाम! कितीतरी दृश्यांमध्ये त्यांचा दिग्दर्शक दिसत राहतो.
अभिनय: ये खूळखुळ्या व्ह भाईर.... आलाय तोंडाला साबण लावून, हू मागं.. सांगीन कि तुला इंग्लीशमदी.... इतका जबरदस्त कडक attitude मी गेल्या दोन हजार अठ्ठावन्न वर्षात बघितलेला नाही. आर्चीला फुटेज जास्त आहे आणि तिने त्याला जस्टीफाय करणे वगैरे च्या फार पलीकडे नेऊन ठेवला आहे. आर्ची चित्रपटाची जान आहे! परश्या इतका निरागस लोभसवाण पात्र सुद्धा अनेक वर्षात चित्रपटात दिसलं नव्हतं. तीच गोष्ट बाळ्या परश्याची. इतका सहज अभिनय कि मोठ मोठ्या नटांनी विचार करावा! मला नकली प्रकारच कुठे आढळला नाही. अय्यो ती आत्या म्हणती तुला म्हणणारी लहानगी, साबण लाऊन लपलं हुतं वाटतं म्हणणारी आर्चीची मैत्रीण, प्रेमपत्र पोहोचवणारं बच्चू, हि सारी पात्र एका जबरदस्त कलाकृतीत देखणे रंग भरतात. या सगळ्यांना प्रत्येकी १०० पैकी २०० मार्क्स!
Cinematography, छायांकन: निव्वळ जबरदस्त! पाखरू जसं आभाळ पांघराया लागतं हे ऐकताना शिवाराच्या वर रात्रीच्या आभाळात उडणाऱ्या पाखरांच्या झुंडी हा एक अजब सुंदर प्रकार आहे. परश्याची एन्ट्री, परश्याची हिरीतली उडी, "भाईर निघ म्हणली" असं म्हटल्यानंतर स्लो मो! एकसो एक सीन आहेत.. मजा आला.
संगीत: काय बोलयचं? मी खूप रात्रीचा शो बघत असल्याने माझ्या मुलाला घेऊन आलो नव्हतो (रातीचा नसता तरी त्याला तीन तास त्याच्या दृष्टीने बिनकामाच्या चित्रपटाला बसवणंसुद्धा चूक झालं असतं म्हणून) नाहीतर झिंग झिंग झिंगाटला आम्ही दोघांनीसुद्धा प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या असत्या. सांगण्याचा उद्देश हा कि संगीत तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतं आणि वरच्या इतर गोष्टींसोबत तुम्हाला "सैराट" व्हायला भाग पाडतं. याड लागलं हे गाणं आणि त्याचं चित्रण हा मला खूप आवडलेला प्रकार.

तात्पर्य: मुलं बिघडतील, जातीव्यवस्था वगैरे मध्ये जास्त फंदात न पडता एक चित्रपट म्हणून एन्जॉय करा. मुलं बिघडवण्यासाठी सध्याच्या काळात पालकच पुरेसे आहेत. गुगलवर सनी लिओने टाईप केलं कि पुष्कळ असतं. घराघरात टीवी अधून दिसणारे विवाहपूर्व, विवाहबाह्य संबंधावर आधारित मालिका बघण पुष्कळ असतं. याचा रोजचा मारा पुष्कळ असतो. मुलांना योग्य वयात त्या वयाला साजेल अश्या गोष्टींमध्ये आवड निर्माण केल्यास, स्वतःच्या जीवनशैलीला संयमित आणि सरळ ठेवल्यास, मित्रासारखं वागल्यास, शक्यतो मुलं वाया नसतील, टोकाचे निर्णय घेत नसतील असं मला वाटतं. उगा तीन तासांच्या चित्रपटातल्या पात्रांना दोषी ठरवण्यात अर्थ नाही.

मुलांचं असं पळून जाणं, खऱ्या आयुष्याची झळ लागल्यावर बिथरण, प्रियकराचा-नवऱ्याची असुरक्षितता , स्त्रीसुलभ भावनेनं तीने घराला स्थैर्य देण्यासाठी घेतलेले श्रम, ओढाताण-प्रेम या सगळ्या खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी आहेत. मला बऱ्याचश्या भावल्या. पटल्या किंवा नाही हा माझ्या मेंदूचा आणि वैयक्तिक अनुभवाचा मामला आहे. त्यात मी पडत नाहीये.

मला तीन तासाची सैराट सफर आवडली.

© सौमित्र साळुंके (११ मे २०१६)

No comments:

Post a Comment