Wednesday, June 8, 2016

सगुणा बाग (निसर्ग निकेतन) १५ ऑगस्ट २०११

ट्रेकला जायचं म्हणजे शांत चित्त, निसर्गाच भान, गप्पा टप्पा आणि मोठमोठ्याने हसण्या खिदळण्यावर नियंत्रण. त्याच करता थोडी विश्रांती आणि गप्पा टप्पा करता याव्यात म्हणून नेरळच्या सगुणा बागेत जायचा निर्णय आम्ही घेतला.

नेरळ रेल्वे स्टेशनच्या जवळच श्री. भडसावळे यांचं हे साधारण ५० एकरभर पसरलेलं हे फार्म आहे. आम्ही दादरहून सकाळी ७.०३ ची कर्जतला जाणारी ट्रेन पकडली आणि ८.३० ला नेरळला पोहोचलो. PICK UP स्पॉट शोधताना गडबड झाली, इकडे तिकडे फिरण झालं पण सांगितल्याप्रमाणे त्यांची PICK UP VEHICLE आली होती आणि आम्ही (आदित्य, आतिश, रीयांका, उपेना, दिव्या, मानसी, फोरम, स्नेहल आणि मी) सगुणा बागेकडे निघालो. आम्ही तिथे पोहोचताच चौकहून निघालेला अमेयसुद्धा त्याच्या बाईक वर तिथे पोहोचला. आणि आमची छोट्याश्या, कंट्रोल्ड मात्र सुरक्षित आणि सुंदर वातावरणात भ्रमंती चालू झाली.

बागेतच सकाळची पोटभर न्याहारी केल्यावर आम्ही “रमेश” गाईड सोबत भ्रमणाला निघालो. रमेशने आम्हाला सुरुवातीला वेगवेगळया वनस्पती आणि वृक्षांची ओळख करून दिली, त्यांची वैशिष्ट्ये समजावून सांगितली. पुढे गांडूळखत बनविण्याची प्रक्रिया आणि ठिकाण दाखवलं जे खरंच स्वागतार्ह असं आहे. आजही आपल्या देशात शेती हाच बहुतांश जनतेचा मुख्य व्यवसाय आहे, शेती आणि शेतीसंलग्न व्यवसाय हेच आजही देशातले सर्वात मोठे आर्थिक क्षेत्र आहे. Samuel Johnson यांच एक अतिशय मार्मिक वाक्य आहे. “Agicuture not only givs riches to a nation, but the only riches she can call her own”. हे एक त्रिकालबाधित सत्य आहे. शेती, संरक्षण आणि अर्थ हे राष्ट्राच्या स्वावलंबनाची प्रतीके आहेत.

पुढे आम्ही गाईच्या गोठ्याला, छोट्याश्या मत्स्यालयाला भेट दिली. वाटेत सुंदरशी बदके तळ्यात विहार करताना दिसली. मत्स्यालयातल्या छोटेखानी जिम मध्ये आदी आणि अमेय ने फोटोपुरता का होईना व्यायाम केला. त्या तिथेच दिव्याचा एक “जादू” भरा फोटो आम्ही काढला. :-D

त्यानंतर आम्ही सारे निघालो “बफेलो राईड” ला. सागर... म्हणजे रेडा जसा पाण्यात उतरला आणि मी त्याच्या पाठीवर घोड्यावर बसल्यासारखा बसलो... नंतर आदित्य चक्क अश्या स्टाईल मध्ये बसला कि अमेय ने त्याला विचारल कि रेड्यावर बसलायस कि हायाबुसा
चालवतोयस? पुढे आतिश ने तर कहर केला... अक्षरश: त्याच्या पाठीवर असा आडवा झालं कि मला वाटलं कि बुडणार आता सागर... फोटो बघा आणि अनुभव घ्या!!!

नंतर खरी धमाल आमची वाट बघत होती.... सुरुवातीला काही कारणामुळे धबधब्यावर जाण्यास स्पष्ट नकार मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तींशी थोडा प्रेमळ संवाद साधला, अडचण समजून घेतली आणि धबधब्यावर जाण्यासाठी गाडी आली. मस्तपैकी अस्सल कोकमाचा सरबत पिऊन आम्ही माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्याकडे निघालो. इथे मात्र बॉस खूप जास्त धम्माल आली. थोडसं ट्रेकिंग झालंच आणि धबधब्यावर पोहोचल्यावर जी काही धमाल आम्ही केली ती लिहिण्यापेक्षा फोटोत स्पष्ट लक्षात येते... उंचावरून येणारा
पाण्याचा लोट... निसर्गाचा फक्त एक लहानसा एलिमेंट आणि त्याच्या खाली आम्ही एव्हढे सारे पण सगळे खुजे त्याच्या आव्वाक्याने इम्प्रेस्ड!... honoured खरं तर. शरीर अक्षरश: शेकून लाल करण्याची ताकद त्यात होती. मुसळधार पाऊस जर पडला असता तर मी
त्याच्या ५० फुटांवर सुद्धा कुणाला जाऊ दिलं नसतं. पण तुलनेने हा खुपच सेफ स्पॉट होता.
तिथून आम्ही पुन्हा बागेत आलो. एव्हाना सडकून भूक लागली होती... बाजूला स्नेक शो चालू असताना आम्ही सगळ्यांनी आमचा स्वत:चा “Snack Show” चालू केला. (मला माहित आहे कि हा अत्यंत वाईट विनोद आहे मात्र याच्याही पेक्षा खतरनाक खतरनाक, वाईट हून वाईट आणि विजेत्याचं पारितोषिक विभागून द्यावं असे विनोद आदित्य आणि अमेय दिवसभर करत होते... त्याबाबतीत तर माझा फक्त गेस्ट अपिअरंस होता)

जेवण झाल्यावर आम्ही मस्त टंगळ मंगळ करत जवळच्या तलावापाशी आलो. आणि मस्त पैकी बोटिंग केलं. मी आणि आदी ने त्यातल्या त्यात बैलगाडीत बसायचा जास्त आनंद घेतला. त्यानंतर काही जण मासेमारी करू लागले... फोरम तर त्यात एव्हढी घुसली होती कि
रमेशला वाटलं आज बहुतेक तळ्यातले सगळे मासे संपणार... चला चला झालं झालं असं त्याने इशाराच देऊन टाकला. J बिचारा.. हा हा !!

मग तिथून आम्ही मुख्य ठिकाणी येऊन आवरा आवर करू लागलो. दिवसभर सुट्टी देऊन देऊन टाकलेले मोबाईल बाहेर काढले. एक छानसा agro-tourism चा अनुभव घेऊन आम्ही परतीच्या प्रवासासाठी गाडीत येऊन बसलो. अमेय त्याच्या बाईकवर पुन्हा स्वार झाला.
एक अतिशय निवांत असा दिवस जगून, फ्रेश होऊन पुन्हा एकदा वाटभर हसत खिदळत आम्ही स्टेशनला निघालो. ६.५५ ची CST ची मस्त ट्रेन मिळाली आणि सगळे पक्षी आपापल्या घरट्याकडे निघाले....

टीप: लोणावळा –माथेरान – माळशेज सारख्या निसर्गरम्य देखण्या ठिकाणांची सवंग प्रवृत्तीच्या लोकांनी आणलेली अवकळा पहाता, थोडसं खर्चिक जरी वाटलं तरी एका अतिशय सुरक्षित कौटुंबिक सहलीसाठी सगुणा बाग अतिशय सुरेख ठिकाण आहे. इथे स्टे सुद्धा करण्याचा चांगला पर्याय उपलब्ध आहे. पाऊस असताना आणि एरव्ही हि सहकुटुंब धबधब्यावर जाणे टाळावे. कारण हा धबधबा सगुणा बागेचा भाग नसून माथेरानचा भाग आहे आणि माळशेज – लोणावळा इथे आढळणारे बीभत्स प्राणी इथेही आढळतात.

सौमित्र साळुंके
(२१.०८.२०११)

No comments:

Post a Comment