Wednesday, June 8, 2016

सुखाची पहाट

रविवारची पहाट असते.. तो थोडं किर्र करून डोळे किलकिले करतो... मलाही जाग येते.. मग त्या हलक्या उजेडात तो माझ्याकडे डोळे किलकिले करून बघतो.. रविवारच्या जाणिवेने माझ्या झोपेची नशा आणखी गडद झालेली असते... तरीसुद्धा मला हे जाणवतं की त्याचा मूळचा चंद्रासारखा राजस चेहरा छान झोपेमुळे अगदीच पौर्णिमेचा चांद झालाय...

तो माझ्याकडे किलकिल्या डोळ्यांनी बघत असताना मी त्याला खात्री देतो, म्हणतो,"बाबा".. तेव्हढ ऐकून तो रांगत माझ्याकडे येतों, माझ्या डाव्या दंडावर त्याचा डावा कान आणि उजव्या पायावर त्याचा उजवा पाय मागे करून टाकतो आणि मला पाठमोरं बिलगतो.. त्याची हलक्याश्या घामाने ओली झालेली मान आणि गळा मला जाणवतो. मग मी त्याची माकडटोपी किंवा टकुचं काढून टाकतो.. आणि त्याच्या मुलायम सोनेरी केसांमधून बोटं फिरवून त्याचे चिप्पू चिप्पू केस जरा सैल करतो...एव्हाना त्याच्या घामाचा सुगंध मला तो अगदी कुक्कुलं होतं तेव्हाच्या घामाच्या सुगंधाची आठवण करता होतो...

मी बायकोला डोळ्यात आनंदाश्रु दाटलेले असताना एकदा सांगितलं होतं.. "शक्य असतं ना तर याच्या या घामाचा सुगंध एखाद्या कुपीत बंद करून ठेवला असता आणि माझ्या आयुष्याच्या अखेरीला, शेवटचा श्वास ती कुपी उघडी करून घेतला असता.."

... मला बिलगलेल्या पाठमोऱ्या चिमण्याला मी एकदा अपादमस्तक बघतो. आईच्या पोटात असल्यासारखा दोन्ही पाय पोटाशी आणि दोन्ही हात समोर ठेवून तो पुन्हा छान निजलेला असतो... माझ्या उजव्या हाताच्या तळव्यात त्याचा मोजातला पाय अलगद धरून मीसुद्धा गाढ झोपतो...

... एरव्ही उठा उठा, ऑफिसला नाही जायचं का? पाणी सोडलय... ब्रेकफास्ट तयार आहे, चला आता तो उठलाच आहे तर त्याला भरवू दे मला, रात्री दहाला खाल्लय त्याने... असं बोलणारी त्याची आई आज असं काही बोलत नाही... बछडयाच्या सहवासाला भुकेल्या बापाला आणि बाबाच्या कुशीत निजलेल्या बछडयाला ती "पोटभर" झोपू देते...

सौमित्र साळुंके (६ फेब्रुआरी २०१५)
(मानसरोवर ते सैंडहर्स्ट प्रवासात)

No comments:

Post a Comment