Wednesday, June 8, 2016

भीमाशंकर ट्रेक: शिडी घाट मार्गे २०.०८.२०११

भीमाशंकर

तालुका: आंबेगाव

जिल्हा: पुणे

समुद्रसपाटीपासून
उंची: साधारण ३२०० फूट.

गेल्या रविवारी सगुणा बाग करून १५ ऑगस्ट ला सकाळी निघायचा मुख्य प्लान होता जो काही कारणास्तव पुढे ढकलला गेला आणि या रविवारी तो पूर्ण करायचा असं ठरवलं. १९ ला दादरहून रात्री शेवटची कर्जत लोकल (१२.५५ दादर ला) पकडून मी आणि आतिश कर्जतला निघालो. आम्हाला किशोर, घाटकोपरला आणि मानस अंबरनाथ ला जॉईन झाले. किशोर स्वतः भीमाशंकरला याआधी सात आठ वेळा जाऊन आला आहे. हा ट्रेक शिडी घाटातून असल्याने आणि मॉन्सूनमधे असल्याने मला त्यातल्या संभाव्य धोक्याची कल्पना होतीच. आम्ही तिघांनी किशोर कडूनbकाही महत्वाची माहिती विचारून घेतली.

रात्री साडे तीन वाजता आम्ही कर्जतला पोहोचलो. बाजूच्या बस डेपोत जाऊन पाहिलं तर आधीच एक दोन ग्रुप तिथे होते. आमच्या पाशी दोन पर्याय होते. १. सकाळी बस येई पर्यंत किंवा बस पूर्ण भरेल इतके लोक येईपर्यंत थांबणे ऑर एल्स जवळ उभ्या असलेल्या टमटम वाल्याला थोडसं कन्विन्स करणं. मी दुसऱ्या एका ग्रुप ला लवकर जाण्याचे फायदे एक्स्प्लेन केले आणि आमच्या सोबत चला म्हटलं. दुसरा प्लान यशस्वी झाला. पर हेड ७० रुपये घेऊन साहेब आम्हाला पहाटे ६ वाजता खांडस ला घेऊन आले. जराही वेळ न् दवडता आम्ही ट्रेक बेसला अर्ध्या तासात हजर झालो. तिथे थोडसं फ्रेश होऊन बरोबर सात वाजता आम्ही शिडी घाटाकडे कुच केलं. बेस पासून विचार करता भीमाशंकर चे दोन टप्पे आहेत. शिडी घाट हा त्या पहिल्याच टप्प्यात लागतो. दगडावर आणि करकचून बांधलेल्या दोरावर लोखंडी शिडीची
मुख्य मदार आहे. पावसाळ्यात निसरडे झालेले आणि सरळ दरीत डोकावणारे तीन चार भितीदायक टप्पे आम्ही शांतचित्ताने आणि एकाग्रतेने एकमेकांना गाईड करत पर केले आणि पहिला टप्पा ओलांडला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जंगलच जंगल. दुसऱ्या टप्प्यात जिथे शिडी घाट आणि गणेश घाट मिळतात तिथून आम्हाला इतर ट्रेकर्स आणि काही शिवभक्त भेटू लागले. बरोबर पावणे अकरा वाजता आम्ही माथ्याशी पोहोचलो. तडक मंदिर गाठले, गर्दी खूप असल्याने खूप लांबून, मंदिराच्या बाहेरूनच महादेवाचे दर्शन घेतले. आम्हाला शिडी घाटातून सुखरूप वर येऊ दिलं म्हणून धन्यवाद म्हटलं. आणि पासाचे वीस तीस रुपये देऊन परमेश्वरासोबत मांडवली करायचा आणि ताटकळत उभ्या असलेल्या भक्तांच्या श्रद्धेचा अपमान करण्याचा आम्हा चौघांचा पिंड नसल्याने आम्ही शिव शम्भोला जेव्हा एकटा असशील तेव्हा ऑफ डे ला पुन्हा भेटू असं बाहेरूनच सांगितल आणि पोटोबाला खुश करायला निघालो, आडवा हात मारला आणि नागफणी कडे निघालो. अर्धा तास खडी चढून एका माथ्यावर पोहोचलो तेव्हा लक्षात आलं कि हि नागफणी नव्हे... हे हे :-D

मग ठीक दीड वाजता आम्ही सरळ खालचा रस्ता धरला अधे मध्ये मस्त धुक्यात चहा मारत आणि येताना गणेश घाट मार्गे, पदर गडाचे जवळून दर्शन घेत बेस च्या ठिकाणी नमके पाच वाजता पोहोचलो. पुन्हा थोडे फ्रेश होऊन नेरळ ला जाणारे कुणी टमटम पार्टनर्स येतायत का ते पाहत बसलो. सहा एक जणांचा एक अतिशहाणा आणि उद्धट लीडर असलेला ग्रुप आला ज्याने टमटमवाल्यांना सरळ शुद्ध भाषेत फाट्यावर मारलं आणि नेरळचं साठ जास्त होतात; आम्ही बारा वर्ष इथे येतोय असं सांगत FASHION STREET वर दुकानदाराचा भाव न् पटल्याच्या थाटात पुढे निघून गेला. मी अक्षरश: हतबद्ध झालो!... माझ्या मनात जो विचार आला तो रिक्षावाल्याने बोलून दाखवला... “आता या पोरास्नी कुनीबी घेऊन नाय जाणार पुढं कुठली गाडीच नही हो सायेब...” असो, आम्ही लोकल्स शी जसं बोलयला हवं त्या आदराने
बोललो आणि त्याचा परिणाम म्हणून... आम्ही चक्क मारुती ओम्नी मधून नेरळ ला निघालो. बऱ्याच पुढे एका “फाट्यावर” आम्हाला तो ग्रुप गावातून गाडी न् मिळाल्याने फरफटत चाललेला दिसला.... बिचारे आणि उद्धट!

गंमत म्हणजे सगुणा बागेतून येताना मिळालेली ६.५५ चीच CST मिळाली आणि आम्ही मुंबई मेरी जान म्हणत आत घुसलो....

काही निरीक्षण:

१. इतर ठिकाण प्रमाणे इथे येणारे भक्तगण सुद्धा प्रचंड प्रमाणात गलिच्छ वागतात.. खाण्याचे पदार्थ तसेच त्याची वेष्टने इतस्तत फेकतात. मला खात्री आहे स्वत:च्या घरात तो प्रकार कुणी करणार नाही.
२. एके ठिकाणी एका बाईक वरून जाणाऱ्या कपल वर आमच्या नजरेसमोर माकडांनी हल्ला बोल करत त्या महिलेच्या हातातली पर्स ओढली, झिप उघडली, त्यातला एक डबा काढून घेतला आणि नंतर सुद्धा तिच्या हातात आणखी काही आहे का हे पाहू लागले. आम्ही काठ्या कुठ्या उचलून त्यांना आरडा ओरडा करून घाबरवले तेव्हा ते बाजूच्या जंगलात पसार झाले.... मात्र डबा घेऊनच!.. याचा अर्थ एकच... यापूर्वी इथे येणाऱ्या लोकांनी अतिशहाणपणा करून या माकडांना खाऊ घातला आहे.. त्याची त्यांना सवय झाली आहे...इतकी कि त्यांना पर्स उघडावी कशी आणि नेमकं कशात खाऊ असतो हे हि माहित झालं आहे... हे कारण झालं आता पर्याय. शक्यतो पाठीवरची पिशवी आणावी आणि हातात एक चांगलीशी काठी असावी. सोप्प.
३. चांगल्यापैकी गिरीभ्रमणाचा सराव असल्याखेरीज शिडी घाटाने जाऊ नये, पावसाळ्यात बिलकुल जाऊ नये. गणेश घाट सुद्धा नितांत सुंदर आणि सहज आहे.
४. भीमाशंकर हे जसं बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे त्याच प्रमाणे हे एक अतिशय जैववैविध्य असलेल अभयारण्य/ जंगल सुद्धा आहे याच भान शिवभक्तांनी राखणं आवश्यक आहे. मोठ्ठ्या आवाजात मोबाईल वर “बेदर्दी राजा” आणि तत्सम गाणी लाऊन आम्हाला “जय भोलेनाथ” असं म्हणणारे दळभद्री लोक सुद्धा भेटले. त्यांच्या जय भोलेनाथ ला मी बम बम भोले ऐवजी कोऱ्या चेहऱ्याने रिप्लाय देत होतो. किशोर ने एक सुंदर वाक्य सांगितलं, “ तुम्ही जंगल बघू शकाल कि नाही माहित नही पण जंगल तुम्हाला बघतचं असतं.. व्वा!
५. नेहमी प्रमाणे पुन्हा त्याच CONCLUSION  वर आम्ही आली. फुकट आणि सहज ACCESSIBLE असलेल्या ठिकाणांची लोक नासधूस करतात... करतातच.
... असो... जय भोलेनाथ!

No comments:

Post a Comment