Wednesday, June 8, 2016

किल्ले राजमाची – दिनांक ६ ऑक्टोबर २०११, विजयादशमी.

सीमोल्लंघन म्हणजे काय तर सीमा लांघने, चौकटी मोडणे... पायातले जड जोखड झुगारून देणे. नव्या क्षितिजाचा धांडोळा घेणे, स्वत:च्या क्षमतेचा अंदाज घेणे.
....
चार दिवसांपासून आतीशची तब्येत ठीक नसल्याने जावं कि न् जावं या विचारात असताना ५ तारखेच्या रात्री आतिशला जरा आराम पडला मात्र त्याला सक्तीची विश्रांती सांगितल्याने, मी आणि सतीशने एलेवंथ अवरला दोघांनीच राजमाची गाठण्याचा निर्णय घेतला. ५ च्या मध्यरात्री मुंबई - भोर आवडता ‘लाल डब्बा’ दादर इस्टला पकडला. सतीशला जागा मिळाली आणि त्याची दाढ दुखत असल्याने तो पेनकिलर घेऊन निद्रिस्त झाला. मी मध्ये मध्ये उभा राहात, मध्ये मध्ये तिसरी सीट घेत होतो. एकदाचे ३ वाजता लोणावळा डेपोत पोहोचलो.
घाईघाईत आल्याने torch विसरलो होतो त्यामुळे ४.३० ला चालू लागण्याचा प्लान फसला. ६ वाजता थोडं उजाडल्यावर राजमाचीच्या दिशेने
निघालो. लोणावळ्याच्या उत्तरेलाच पण किंचितसा पश्चिमेला राजमाची वसला आहे. राजमाचीवर श्रीवर्धन आणि मनरंजन असे दोन दुर्ग आहेत. लोणावळा ते राजमाची हि वाट जवळजवळ २२ किलोमीटरची आहे, त्यात पुन्हा हे दोन दुर्ग आणि उतरताना राजमाचीच्या
उत्तर- पश्चिमेकडून कोंदिवडे गावात खोल उतरायचं म्हणजे पाय गळ्यात घेण्याचा प्रकार होता.

२२ किलोमीटर ची वाट तुडवत आणि सह्याद्रीच्या भव्यतेची अनुभूती घेत साडे दहा वाजता ‘उधेवाडी’ या पायथ्याच्या गावी पोहोचलो. तिथे एका सद्गृहस्थाच्या घरी थोडीशी पोटपूजा केल्यावर आम्ही श्रीवर्धनच्या वर पोहोचलो. बरोब्बर १२ वाजता आम्ही माथ्यावर होतो आणि चटके खात किल्ल्याचा परिसर पाहिला. पुन्हा उधेवाडी मध्ये वेगात पायउतार झालो. दसऱ्याच्या पूजेकरता मुंबईत ६-७ पर्यंत पोहोचायचे असल्याने ‘मनरंजन’ चा मोह आवरता घ्यावा लागला आणि साधारण एक वाजता राजमाचीच्या डाव्या अंगावरून उतरू लागलो.

हि जी वाट आहे ती दाट जंगलातून जाते (इथे याच वाटेवर थोडी वाट वाकडी केल्यास “कोंडणे गुंफा” गाठता येतात). इथे आम्हाला कंपास चा अतिशय अतिशय जास्त उपयोग झाला. जिथे दोन चार वाट दिसत होत्या तिथे केवळ कंपास मुळे खालची वस्ती लोकेट करणं शक्य झालं आणि एकाही वाट न् चुकता आम्ही खाली ‘मुंढेवाडी’ या वस्तीत बरोब्बर दीड तासात पोहोचलो. हा खरंच खूप चांगला वेग आहे. तिथून मग रणरणत्या उन्हात एक तास पायपीट करून ‘कोंदिवडे’ गावात पोहोचलो. आणि थोडीशी चलाखी वापरून १०० रुपयात दोघे कर्जतला
पोहोचू अशी व्यवस्था केली. टमटमवाला सुद्धा तसा समजूतदार होता. दिवसभरात एकंदर किमान ३०-३५ किलोमीटरची पायपीट करून शेवटी एकदाचे कर्जतला पोहोचलो आणि ४.२० ची छत्रपती शिवाजी टर्मिनस पकडून हर हर महादेव म्हणत मुंबईकडे रवाना झालो.

... एक सीमोल्लंघन जाहले.

काही महत्वाच्या नोंदी आणि निरीक्षण:

१.     लोणावळा राजमाची वाटेवर एक वाट धाक बहिरीस जाते

२.     इथे एखादा संध्याकाळी उधेवाडीस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पहाटे दोनही दुर्ग निवांत पाहून पुन्हा राजमाची लोणावळा वाटेनेच मुंबईस परतणे जास्त “सोयीस्कर”. अर्थात हे कुटुंब – परिवारच्या दृष्टीकोनातून सांगतोय.

३.     जर राजमाचीच्या डावीकडून कोंदिवडे इथे उतरायचे असल्यास कंपास हवीच. किंवा दिशांचा खूप चांगला अंदाज आणि अभ्यास हवा.

४.     राजमाचीच्या उजवीकडच्या दरीमध्ये “उल्हास” नदीचा उगम होतो. ती दारी पाहणे निव्वळ थ्रील आहे.

~ सौमित्र साळुंके (०८.१०.२०११)

No comments:

Post a Comment